LockDown: घराकडे पायी निघालेल्या ४० मजुरांची तेलंगणा पोलिसांनी घेतली जबाबदारी

LockDown: घराकडे पायी निघालेल्या ४० मजुरांची तेलंगणा पोलिसांनी घेतली जबाबदारी

मूळचे मध्य प्रदेशमधील ४० मजुर तेलंगणातून पायी चालत घराकडे निघाल्याची घटना तेलंगणात घडली. या मजुरांना पोलिसांनी अडवले असून त्यांची राहण्याची, खाण्या-पिण्याची सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते मजूर माघारी फिरले. तेलंगणामध्ये रोजंदारीवर काम करणारे हे मजूर देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची बातमी कळताच हवालदिल झाले. आपल्या पोटापाण्याचे हाल होणार या कल्पनेने विचलित झालेले तब्बल ४० मजूर पायीच घराकडे निघाले. मात्र संचारबंदीत जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्याने त्यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही. शिवाय त्यांची संपूर्ण जबाबदारी तेलंगणा पोलिसांनी घेतल्याचे समजते.

हेही वाचा – कोरोना नंतर नवं टेंशन, जगातील ११ कोटी मुलांना ‘या’ आजाराचा धोका!

मजुरांना घरांची चिंता 

यापूर्वी २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर मजुरांनी संयम ठेवत आहे तिथेच राहण्याचे ठरवले. मात्र काल पुन्हा ३ मेपर्यंतचा लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर या मजुरांचा संयम सुटला. आता बिनाकामाचे परप्रातांत राहणे अशक्य आहे, असे म्हणत त्यांनी त्यांच्या गावाची वाट धरली. वाहतुकीचे कोणतेही साधन नसल्याने त्यांनी पायी चालत जाण्याचे ठरवले.

मुंबई, गुजरातमध्ये कामगारांचा जमाव

लॉकडाऊन वाढवल्यामुळे सर्वच राज्यांतील मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल एकाच दिवसात मुंबई आणि गुजरातमध्ये कामगारांनी बंड पुकारल्याच्या घटना पाहायला मिळाल्या होत्या. मुंबईतील वांद्रे स्थानकांवर १००० कामगारांनी गर्दी करत उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्याचा हट्ट केला. मात्र पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने गर्दीला थोपवून ठेवले. तर गुजरातमधील सूरतमध्येही अशाच प्रकारे कामगारांनी आक्रोश करत गर्दी केली होती.

First Published on: April 15, 2020 2:45 PM
Exit mobile version