दहा रुपयांची नाणी चलनात कायम

दहा रुपयांची नाणी चलनात कायम

10 rupees coin

दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाली नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. सध्या बाजारात खोटी दहा रुपयांची नाणी बरीच चलनात आहेत. त्यामुळे ही नाणी अनेक दुकानदार, विशेषत: उत्तर भारतातील दुकानदार स्वीकारत नाहीत. त्यामुळे ही नाणी चलनातून बाद झाली की काय, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र केंद्र सरकारने खुलासा करून ही नाणी अद्यापही चलनात असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार जयप्रकाश नारायण यादव यांनी लोकसभेत शून्य प्रहरात दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भातील प्रश्न विचारला. बिहार आणि झारखंडमध्ये अनेक दुकानदार, रिक्षाचालक, इतर व्यावसायिक दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत. ही नाणी एकूण १४ प्रकारात असल्याने ती स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणानंतरही दहा रुपयांच्या नाण्यासंदर्भात लोकांमध्ये अनेक शंका आहेत. त्यामुळे लोक ही नाणी घेण्यास तयार नसतात, असं यादव यांनी सांगितलं.

दरम्यान, या वर्षीच रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून दहा रुपयांची नाणी वैध असून ही नाणी चलनातून बाद झाली नसल्याचं म्हटलं होतं. १४ प्रकारातील ही सर्व नाणी अधिकृत असल्याचंही बँकेने आधीच स्पष्ट केल्याचं संसदेत सांगण्यात आलं.

First Published on: December 21, 2018 4:48 AM
Exit mobile version