खाशाबांची महानता सांगताना सचिनवर आरोप

खाशाबांची महानता सांगताना सचिनवर आरोप

Raju-Shetty-Sachin

सातारा:-ऑलिम्पिक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांची महानता सांगताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला मात्र दुषणे दिली आहेत. सचिनने किती धावा काढल्या व किती मॅचफिक्सिंग केले हे पहाता त्याला भारतरत्न दिले आहे. आज देशात भलत्या सलत्यांचा सन्मान केला जातो, असे आरोप राजू शेट्टी यांनी केले आहेत. महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत सातार्‍याचा संघ मैदानात उतरणार आहे. यशवंत सातारा संघाचा एक कार्यक्रम २९ ऑक्टोबर रोजी सातार्‍यातील गोळेश्वर या गावी पार पडला. तेथे राजू शेट्टी बोलत होते.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, सचिन तेंडुलकर याने किती धावा केल्या आणि किती मॅचफिक्सिंग केले हे न पहाता त्याला भारतरत्न दिले जाते. मात्र खाशाबा जाधवांचा सन्मान करण्यात केंद्र आणि राज्य सरकार कमी पडते. खाशाबा हे सचिनपेक्षा तूसभरही कमी नव्हते. पण ते खेड्यातून आल्यामुळे त्यांना डावलण्यात आले. त्यांच्यावर अन्याय का झाला हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. खाशाबा जाधवांना पद्मभूषण मिळवण्यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. गृहमंत्री पी. चिदंबरंम यांच्याकडे मी पाठपुरावा केला होता. त्यावेळी त्यांनी ह्यात नसलेल्या वक्तीस असा पुरस्कार दिला जात नाही, असे सांगितले. तरीही शासन दरबारी खाशाबा जाधवांच्या सन्मानासाठी लढाई सुरु ठेवणार आहे. ऑलिम्पिकमध्ये अनवाणी जाऊन पदक जिंकणार्‍या खाशाबा जाधव यांची पद्मभूषणपासून उपेक्षा का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

First Published on: October 31, 2018 1:33 AM
Exit mobile version