आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची स्थिती आणखी गंभीर, नागरिकांची ससेहोलपट

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची स्थिती आणखी गंभीर, नागरिकांची ससेहोलपट

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथील महागाई गेल्या 48 वर्षांतील उच्चांकीवर पोहोचली आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, अशी स्थिती पाकिस्तानात आहे. बेलआउट पॅकेजबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतची (IMF) चर्चाही अद्याप फळाला आलेली नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.

सर्वात वाईट अवस्था पाकिस्तानातील सामान्य जनतेची आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. सद्यस्थितीत लोकांना अन्नाची चिंता आहे, तूर्तास तरी शिक्षण आणि इतर गोष्टींची चिंता गौण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील एका स्थानिक सीफूड व्यापाऱ्याने सांगितले की, महागाईमुळे त्यांची विक्री निम्मी झाली आहे. विशेषत:, मध्यमवर्गीय लोकांनी खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेतला आहे. केवळ श्रीमंतवर्गच वाढत्या महागाईचा सामना करू शकतो.

त्याचप्रमाणे, एका पेट्रोल पंपच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्यांच्या पेट्रोल पंपावरील तेलाच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी रांग असायची, पण आता पेट्रोल पंप जवळपास रिकामेच असते. पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 262 रुपये झाली असल्याने सध्या पेट्रोल पंपावर शुकशुकाट दिसत आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांना पाकिस्तानात घरखर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागते. जीवन जगणे खूप कठीण झाले आहे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. परंतु अशा परिस्थितीत ते काहीही करू शकत नाहीत.

पाकिस्तानातील शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. वीज आणि मजुरीचा खर्च वाढल्याने शेती हा आता फायदेशीर व्यवहार राहिलेला नाही. यासोबतच विजेच्या तुटवड्यामुळेही पाकिस्तानी जनता त्रस्त आहे. पाकिस्तानचे शेतकरी मोहम्मद रशीद म्हणतात की ‘आमच्याकडे पुरेसे अन्न नाही, मग वीज, शिक्षण आणि कपड्यांची व्यवस्था कुठून करावी’.

आयएमएफसमवेत चर्चा सुरूच
पाकिस्तान सरकारला 7 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) अटी व शर्तींचे मेमोरेंडम मिळाले आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी शुक्रवारी सांगितले. 10 दिवस चर्चा केल्यावर गुरुवारी रात्री आयएमएफचे शिष्टमंडळ पाकिस्तानातून रवाना झाल्यानंतर डार यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाच्या नवव्या पुनरावलोकनावर आभासी (व्हर्च्युअल) चर्चा सुरू राहील, असेही डार म्हणाले.

First Published on: February 11, 2023 1:22 PM
Exit mobile version