काँग्रेसचा पुन्हा गरिबी हटाव नारा

काँग्रेसचा पुन्हा गरिबी हटाव नारा

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या लोकसभा निवडणुका ’गरीबी हटाव’ या घोषणेने जिंकल्या होत्या. त्यानंतर माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनीही याच मोहिमेचा आधार घेतला होत्या. मागील चार वर्षे सत्तेपासून लांब असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा याच घोषणची आठवण झाली आहे. त्यामुळे नवीन ‘गरीबी हटाव’ मोहीम घेऊन काँग्रेस यावेळच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल. त्यामुळे देशात कोणीच गरिब रहाणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील एका सभेत सांगितले.

देशातील सर्व राज्यांमध्ये गरीबांना किमान उत्पन्न देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. हे उत्पन्न थेट गरीबांच्या बँक खात्यात जाईल. ही योजना देशात नव्हेतर जगातील एकमेव योजना आहे. कोणत्याच देशाने ही योजना राबवलेली नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ही योजना लागू झाल्यामुळे कोणीही भूकेला आणि गरिब रहाणार नाही. ही योजना आम्ही छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर सर्व राज्यांमध्ये राबवू. पहिल्यांदाच काँग्रेस एक ऐतिहासिक योजना लागू करणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला एक संधी द्यायची आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी हे वक्तव्य छत्तीसगड विधान सभा निवडणुकीत काँग्रेसला संधी दिल्याबद्दल, तेथील जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या ‘किसान आभार संमेलन’ सभेत केले. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात शेतकर्‍यांचे कर्ज सत्तेत आल्यापासून १० दिवसांत माफ करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्याबरोबर दुसर्‍या दिवशीच शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाले.

First Published on: January 29, 2019 5:41 AM
Exit mobile version