“क्रांतीचे नाव राहुल गांधी” तुरुंगातून सुटल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी केले वक्तव्य

“क्रांतीचे नाव राहुल गांधी” तुरुंगातून सुटल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी केले वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची 10 महिने शिक्षा भोगल्यानंतर पटियाला तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर सिद्धू म्हणाले की, आजच्या काळात काही क्रांती होत असेल तर त्याचे नाव राहुल गांधी आहे. देशात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली आहे, तेव्हा क्रांतीही आली. यावेळी क्रांतीचे नाव राहुल गांधी आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीवर बेड्या लादण्याचे प्रयत्न सुरू असून पंजाब देशाची ढाल आणि या बेड्या तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाबला कमकुवत करणारे स्वत: कमजोर होतील आणि यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचे सिद्धू यांनी सांगितले.

रोड रेज प्रकरणी ५९ वर्षीय नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना 2 महिने आधीच तुरुंगातून सोडण्यात आले. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्ते बर्फ नाहीत की ते वितळतील. ते आजही काँग्रेससोबत उभे आहेत आणि भविष्यातही उभे राहतील. म्हणूनच मी म्हणतो की, जो सत्याचा आवाज आहे तोच योग्य आहे. त्यामुळे मला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विचारायचे आहे की, तुम्ही यापूर्वी पंजाबमधील जनतेला मोठी स्वप्ने दाखवली. पण आज पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही.

‘मला मृत्यूची भीती नाही’
मी संविधानाला माझा ग्रंथ मानतो, मात्र पंजाबमध्ये हुकूमशाही होत आहे. ज्या संस्था संविधानाचे बलस्थान होत्या, त्या संस्था आज गुलाम झाल्या आहेत. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, मला मृत्यूची भीती वाटत नाही, कारण मी जे काही करतो ते पंजाबच्या पुढच्या पिढीसाठी करत असल्याचे सिद्धू म्हणाले.

सिद्धू यांची मुदतपूर्व सुटका
विशेष म्हणजे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची शिक्षा सुनावण्यापूर्वी दोन महिन्यांपूर्वीच त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांचे वकील एचपीएस वर्मा यांनी सांगितले की, पंजाब तुरुंगाच्या नियमांनुसार कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याला वेळेपूर्वी सोडले जाऊ शकते. या नियमानुसार कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याची शिक्षा दर महिन्याला ५ ते ७ दिवसांनी कमी होते. याच आधारावर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीही मुदतपूर्व सुटका झाली.

35 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
1988 सालच्या रोड रेज प्रकरणात सिद्धूला गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. 10 महिने शिक्षा भोगल्यानंतर त्यांची आज सुटका करण्यात आली. खरं तर, 27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेट मार्केटमध्ये होते. या मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग याच्याशी त्यांचा वाद झाला आणि पुढे हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला होता.

First Published on: April 1, 2023 7:43 PM
Exit mobile version