संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा नवा आठवडा देखील वादळी ठरण्याची शक्यता

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा नवा आठवडा देखील वादळी ठरण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरू आहे. अदानी-हिंडेनबर्ग आणि लंडनमध्ये राहुल गांधींच्या लोकशाहीबद्दलच्या वक्तव्यावरून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधक व सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संसदेत फारसे काम होऊ शकलेले नाही. आज, सोमवारी पुन्हा संसदेत सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम असताना, राहुल गांधींनी माफी मागावी, अशी आग्रही मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे, परिणामी संसदेत कोंडी झाली असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनात दररोज गदारोळ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होत असून, त्यात पुढील रणनीतीवर चर्चा होईल.

अदानीच्या मुद्द्यावरून विरोधक संसदेपासून रस्त्यापर्यंत हल्लाबोल करत आहेत, तर भाजपा राहुल गांधींच्या वक्तव्यावर संसदेचे कामकाज चालू देत नाही. राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर भारताचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे भाजपाचे म्हणणे आहे. तर, राहुल गांधी काहीही चुकीचे बोलले नाहीत, मग त्यांनी माफी का मागावी, असा सवाल कांग्रेसचा आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला अवघे दोन आठवडे उरले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 एप्रिलला संपणार आहे. या कालावधीत केंद्र सरकारला अर्थसंकल्प मंजूर करायचा आहे. नियमांनुसार, केंद्रीय अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच 31 मार्च 2023 पूर्वी मंजूर होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, बजेट मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार या आठवड्यात प्रयत्न करू शकते.

राहुल गांधी यांचे ट्वीटवरून होऊ शकतो वाद
होळीनंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांच्या लंडनमध्ये लोकशाहीवरच्या वक्तव्यावरून सतत गदारोळ सुरू आहे. विशेष म्हणजे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधक अदानी मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करत होते, तर आता दुसऱ्या टप्प्यात, सरकार आक्रमक झाले आहे. अशा परिस्थितीत रविवारी राहुल गांधी यांच्या ‘सावरकर समझा क्या… नाम राहुल गांधी है’ या ट्वीटमुळे संसदेमध्ये काय होणार आहे, याची कल्पना येते.

First Published on: March 20, 2023 10:26 AM
Exit mobile version