म्हणून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांमध्ये घट; समझौतामध्ये फक्त १२ प्रवाशी

म्हणून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांमध्ये घट; समझौतामध्ये फक्त १२ प्रवाशी

समझौता एक्स्प्रेस पुन्हा सुरू

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असे निर्माण झाले आहेत. सीमेवर रोजच काहीना काही घडामोडी घडत आहेत. २७ फेब्रुवारी रोजी भारताने पाक व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. त्यानंतर २८ फेब्रुवारीपासून पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस बंद केली होती. मात्र आज (दि. ४) रोजी ही रेल्वेसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. तर पाकिस्तान रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरमधून भारताकडे रवाना झालेल्या समझौता एक्स्प्रेसमधून एकूण १५० प्रवाशी भारतात परतले आहेत. दिल्लीहून ही एक्स्प्रेस रेल्वे फक्त १२ प्रवाशांना घेऊन रविवारी रात्री जुन्या दिल्लीमधून अटारीकडे रवाना झाली होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारतामधून पाकिस्तानात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये घट झाली असल्याचे दिसत आहे.

सहमतीने सुरु झाली समझौता

समझौता एक्स्प्रेस ही दिल्ली ते लाहोर अशा दोन स्थानकादरम्यान दोन्ही देशांमध्ये प्रवास करते. ही रेल्वे लाहोर येथून दर सोमवरी आणि गुरूवारी दिल्लीकडे रवाना होते. तसेच बुधवारी आणि रविवारी ही रेल्वे दिल्लीतून लाहोरला जाते. २८ फेब्रुवारीला या रेल्वेचा प्रवास थांबवण्यात आला होता. आता ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सहमतीने समझौता एक्स्प्रेस रेल्वे सेवा चालू करण्यात आली आहे, असे दिल्लीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

१९७१ च्या युद्धानंतर रेल्वे सेवा सुरू

भारत आणि पाकिस्तानमध्ये समझौता एक्स्प्रेस १९७१ मध्ये झालेल्या युद्धानंतर शिमला करारानुसार २२ जुलै १९७६ रोजी सुरू करण्यात आली होती. समझौता एक्स्प्रेस ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध चांगले बनवण्यासाठी मानली जाते. या रेल्वेमध्ये सहा स्लीपर कोच आणि एसी-३ टियर कोच आहेत.

First Published on: March 4, 2019 6:13 PM
Exit mobile version