पत्रकारांच्या प्रश्नांना मोदींची बगल; ‘द टेलिग्राफ’ने कोरी बातमी छापली

पत्रकारांच्या प्रश्नांना मोदींची बगल; ‘द टेलिग्राफ’ने कोरी बातमी छापली

पंतप्रधान मोदींच्या पत्रकार परिषदेतील मौनानंतर द टेलिग्राफने अशी बातमी केली. (सौजन्य - द टेलिग्राफ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद कधी घेणार? पत्रकारांच्या प्रश्नाला कधी सामोरे जाणार? असे प्रश्न विरोधकांकडून मागच्या पाच वर्षांपासून सतत विचारण्यात येत होते. १९ मे रोजी सतराव्या लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्याआधी काल (१७ मे) मोदींनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. मात्र तब्बल ५२ मिनिटे ते पत्रकार परिषदेत शांत बसले. मोदींच्या या मौनी वृत्तीचा इंग्रजी दैनिक द टेलिग्राफने चांगलाच समाचार घेतला आहे. मोदींच्या पत्रकार परिषदेतील शांत चेहऱ्याचे फोटो छापून टेलिग्राफने बातमीची जागा रिकामी ठेवली आहे. “आम्ही ही जागा राखून ठेवत आहोत. ज्यादिवशी मोदी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देतील तेव्हा आम्ही ही जागा भरू”, अशी तळटीपही मोकळ्या बातमीखाली देण्यात आली आहे.

द टेलिग्राफने मोदींवर अशापद्धतीने टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. पुलवामा हल्ला झाल्यानंतर मोदींचे एका आठवड्यातील रोजचे हसतमुख चेहरे टेलिग्राफने छापले होते. त्यानंतर आता पहिल्या पानावरील बातमीची जागाच मोकळी ठेवून हजार शब्दांत जे मांडता आले नसते ते टेलिग्राफने मोकळ्या जागेने साधले आहे. तसेच ५२ मिनिटे ४८ सेकंद चाललेल्या या पत्रकार परिषदेत मोदींच्या शांत बसलेल्या काही छटा दाखवण्यात आल्या आहेत. ४१ व्या मिनिटाला मोदींना प्रश्न विचारण्यात आला, मात्र मोदींनी मी शिस्तप्रिय सैनिक असल्याचे सांगत पक्षाचे अध्यक्षच उत्तर देतील, असे सांगून माईक अमित शहा यांच्याकडे सरकवला.

पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांनी टेलिग्राफचे पहिले पान असे होते. (छायाचित्र – द टेलिग्राफ)

वृत्तपत्रांसाठी प्रत्येक पानावरील जागा अतिशय महत्त्वाची असते. वर्तमानपत्रांना मोकळी जागा ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसते. मात्र टेलिग्राफने आपले म्हणणे मांडण्यासाठी हा धोका पत्करला. विरोधाभास म्हणजे मोदींच्या या पहिल्या पानावरील बातमीखाली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बातमी छापण्यात आली आहे. ‘Rahul Answers Questions’ असे शीर्षक त्या बातमीला देण्यात आले आहे. त्यावरूनच मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधील तत्कालीन फरकही टेलिग्राफने समोर आणला आहे.

वर्तमानपत्रांनी अशी बातमीची मोकळी जागा ठेवून थेट पंतप्रधान यांच्यावर भाष्य करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. याआधी मोकळी जागा ठेवून वर्तमानपत्रांनी निषेध व्यक्त केलेले अनेक प्रकरणे आहेत. आणीबाणीच्या काळात अनेक वृत्तपत्रांनी रिकामे संपादकीय छापले होते. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर प्रशासनाने वर्तमानपत्रांच्या जाहीराती बंद केल्या होत्या. त्याचा निषेध करण्यासाठी काश्मीर एडिटर्स गिल्डने पहिले पान कोरे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ग्रेटर काश्मीर, काश्मीर रिडर या सारख्या मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांसहीत १५ वृत्तपत्रांनी अशाप्रकारचा निषेध व्यक्त केला होता.

सरकारी जाहीराती बंद केल्याच्या विरोधात काश्मीरमधील वर्तमानपत्रांनी असा निषेध व्यक्त केला होता.

तसेच जून २०१८ मध्ये काश्मीरमध्येच पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या केल्याच्या विरोधात काश्मीर एडिटर्स गिल्डने आवाहन केल्यानंतर सर्व वृत्तपत्रांनी संपादकीय जागा मोकळी ठेवली होती. संपादकीय रिक्त ठेवून पत्रकारांचा आवाज कसा दाबला जातोय, हे दाखवण्याचा प्रयत्न एडिटर्स गिल्डने केला होता.

पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वृत्तपत्रांनी संपादकीय मोकळे ठेवले होते.
First Published on: May 18, 2019 10:37 AM
Exit mobile version