संरक्षण खरेदीत भ्रष्टाचार ही काँग्रेसची परंपरा

संरक्षण खरेदीत भ्रष्टाचार करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, असा आरोप करतानाच सुप्रीम कोर्टावरही आता काँग्रेसचा विश्वास राहिलेला नसल्याचा ठपका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवला. मोदी येथे रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनावेळी बोलत होते. राफेल खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यावर एकीकडे काँग्रेस प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना मोदी यांनी रायबरेलीतच काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

देशासमोर दोन शक्ती आहेत. एक देश कसा संरक्षण क्षेत्रात ताकदवान होईल आणि दुसरी ताकद देशाचे कसे खच्चीकरण होईल यासाठी प्रयत्न करत आहे. देश पाहतोय की काँग्रेस देशाला कमजोर करणार्‍या शक्तीबरोबर उभा आहे. ती शक्ती संरक्षण दले ताकदवान होण्याच्या विरोधात आहे, असे सांगताना मोदी यांनी रामचरितमानस या ग्रंथाचा आधार घेत काही लोक खोट्याचाच स्वीकार करतात, खोटेच सांगत फिरतात, खोटेच खातात आणि चावतात, असा टोलाही लगावला.
या लोकांसाठी संरक्षण मंत्रालयही खोटे वाटतेय, देशाचे संरक्षण मंत्रीही खोटे वाटतात, हवाईदलाचे अधिकारीही खोटेच वाटतात आणि आता तर सर्वोच्च न्यायालयही खोटे वाटू लागले आहे. खोटे कितीही बोलले गेले तरीही त्यामध्ये आत्मा असत नाही. खोटेपणावर नेहमी सत्याचाच विजय होतो, असेही मोदी यांनी सांगितले.

कारगिल युद्धानंतर आपल्या हवाईदलाला अत्याधुनिक विमानांची गजर भासू लागली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनंतर काँग्रेसने 10 वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, हवाईदलाची ताकद वाढविली नाही. कशासाठी, कोणाच्या दबावाखाली, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.

दरम्यान, काँग्रेसनेही मोदी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सांगितले की, जो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलू शकतो, त्याच्याकडून सत्याची अपेक्षा कशी करता येईल. सरकारने खोटे सांगतिल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय त्वरित मागे घ्यायला हवा. तसेच सरकारला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवायला हवी, असे काँग्रेसचे प्रवक्ता शर्मा यांनी सांगितले.

First Published on: December 17, 2018 5:25 AM
Exit mobile version