युक्रेन युद्ध हा जगातील सर्वात मोठा मुद्दा; मोदी – झेलेन्स्की यांची G7 शिखर परिषदेत भेट

युक्रेन युद्ध हा जगातील सर्वात मोठा मुद्दा; मोदी – झेलेन्स्की यांची G7 शिखर परिषदेत भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी (20 मे) जपानमधील हिरोशिमा येथे जी-7 शिखर परिषदेसाठी गेले आहेत. या ठिकाणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांची मोदींनी भेट घेतली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या वेळी ही भेट झाल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मोदींनी या भेटीचे आणि बैठकीचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत.

गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात वारंवार दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. पण आज जी-7 शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच भेट झाली आहे. या भेटीवेळी मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी भेटीवेळी युक्रेनमध्ये युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

यावेळी मोदी म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध हा जगातील एक मोठा मुद्दा आहे. मी याला केवळ राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मुद्दा न मानता, तो माझ्यासाठी मानवतेचा प्रश्न आहे. भारत आणि मी या समस्येचे निराकारण करण्यासाठी माझ्याकडून जे काही करू शकतो ते करू, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, जी-7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सहभागी झाले होते. बिडेन यांच्यासोबत पंतप्रधान मोदीही एका सत्रात सहभागी झाले होते. यावेळी जो बिडेन यांनी पंतप्रधान मोदींच्या जवळ जात गळाभेट घेतली. अवघ्या काही सेकंदांची भेट झाली असली तरी जो बिडेन स्वतःहून पंतप्रधान मोदींना भेटायला येण्याचा चर्चेचा विषय आहे. शनिवारी मोदी यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले.

 

First Published on: May 20, 2023 6:26 PM
Exit mobile version