जम्मूमध्ये सुरक्षा दल जवानांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

जम्मूमध्ये सुरक्षा दल जवानांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

जम्मूः जम्मू- श्रीनगरमध्ये सुरक्षा दल व अतिरेक्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त आहे. यावेळी सुरक्षा दलाने मोठा शस्त्रसाठाही जप्त केला. पुढील महिन्यातील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले.

जम्मू येथील अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा दलाची अतिरेक्यांसोबत चकमक झाली. तवाई पुलावर एक ट्रक संशायस्पदरित्या आढळून आला. दाट धुके पडले होते. ट्रकच्या हालचालींमुळे सुरक्षा दलाला संशय आला. आम्ही ट्रकचा पाठलाग केला. सिध्रा चेक पाॅईंटवर हा ट्रक थांबवण्यात आला. लघूशंकेचे कारण देऊन ट्रकचा चालक पळून गेला.

त्यानंतर ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ट्र्कमधून अंधादुंध गोळीबार सुरु झाला. सुरक्षा दलाने त्याला चोख उत्तर दिले. खूप वेळ ही चकमक सुरु होती. दोन्ही बाजूने ग्रेनाईडचे हल्ले सुरु होते. तुफान गोळीबार सुरु होता. बाॅम्ब व गोळीबारामुळे धुराचे लोट परिसरात होते. मात्र चकमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांना ठार केले. पळून गेलेल्या ट्रक चालकाचा शोध सुरु आहे. हा ट्रक नेमका कुठून आला. हे अतिरेकी कुठून आले. कुठे घातपात करण्याचा त्यांचा कट होता याची चौकशी सुरु असल्याची माहिती सिंग यांनी दिली.

हे अतिरेकी कोणत्या संघटनेचे आहेत याची माहिती अजून मिळालेली नाही. तीन अतिरेकी ठार झाले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे अतिरेकी पाकिस्तानातून आले होते. काश्मिरकडे येणारा ट्रक चालक त्यांना येथे घेऊन येत होता का?, असा प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. हा चौकशीचा भाग आहे व याची चौकशी केली जाईल, असे सिंग यांनी स्पष्ट केले. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून सात एके-४७ रायफल, एक M-4 रायफल, तीन पिस्तुल व मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

First Published on: December 28, 2022 4:05 PM
Exit mobile version