Video: स्टेशनवर मरुन पडलेल्या आईला उठवण्यासाठी चिमुकल्याची धडपड

Video: स्टेशनवर मरुन पडलेल्या आईला उठवण्यासाठी चिमुकल्याची धडपड

हृदय पिळवटून टाकणारी घटना

बिहारच्या मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. संवेदनशील हृदय असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा व्हिडिओ पाहून स्वस्थ बसवणार नाही. देशभरातील स्थलांतरीत मजूर कोणत्या हालअपेष्टा सहन करत आहेत, हे या व्हिडिओतून दिसून येते. खरंतर संपुर्ण देशातूनच मजुरांची व्यथा सांगणारे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र बिहारच्या घटनेने व्यवस्थेला, आपल्या माणून म्हणून असण्याला आव्हान दिले आहे. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेबद्दल जाणून घ्या.

“बिहारच्या मुझफ्परपूर रेल्वे स्टेशनवर एक लहान मुलगा त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करतोय. ही महिला मजूर मृत पडलेली असून रेल्वेने तिच्या अंगावर फक्त एक चादर टाकून झाकलं आहे. आपली आई या जगात नाही, या वास्तवाशी अनभिज्ञ असलेला हा चिमुकला आईने उठावे म्हणून वारंवार तिच्या अंगावरची चादर काढून टाकत आहे.” रेल्वे कर्मचाऱ्यांनी या महिला मजुराच्या मृतदेहाला हात न लावता तसेच स्टेशनवर सोडून दिले होते, असा आरोप होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेची उद्घोषणा ऐकायला मिळत आहे. इतका भीषण प्रसंग झालेला असूनही स्टेशनवर जनजीवन अगदी सामान्य होते.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, ही महिला मजूर श्रमिक विशेष रेल्वेने अहमदाबादहून मुझफ्फरपूरला पोहोचली होती. तर रेल्वेने ट्विट करत म्हटले आहे की, “ती कटिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली होती. २५ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला होता, त्यानंतर रेल्वेने तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.”

 

या घटनेतील सत्य काहीही असले तरी स्थलांतरीत मजूर ज्या यातना भोगत आहेत, अशा यातना याआधी कधीच भारतातील मुजरांनी भोगल्या नव्हत्या. शेकडो मजूर आपल्या घरी परतत असताना मृत्यूमुखी पावलेले आहेत. काही जण रस्ते अपघात, थकवा, उपासमार, हृद विकाराचा झटका किंवा इतर कारणांमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. लाखो कामगार लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता संपत आला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवला जाणार का? याची अजूनही निश्चिती झालेली नाही. मध्यम वर्ग या काळात घरी बसलेला असला तरी मजुरांचे मात्र या लॉकडाऊनने चांगलेच हाल केले.

First Published on: May 28, 2020 9:04 AM
Exit mobile version