प्रजासत्ताक दिनी आसाममध्ये दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला

प्रजासत्ताक दिनी आसाममध्ये दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला

आसाममध्ये दोन ठिकाणी स्फोट

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आसामच्या दिब्रूगड येथे दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. यामधील पहिला स्फोट हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ जवळ झाला आहे तर दुसरा स्फोट दिब्रूगडमधील एका गुरुद्वारा जवळ झाला आहे. हे स्फोट केवळ अर्धा तासाच्या आतमध्येच झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांच्या माहितीनुसार, या दोन्ही स्फोटांच्या घटनांची माहिती कळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. आसामचे डीजीपी भास्कर महंत यांनी या स्फोटासंबंधी माहिती देताना असं म्हटलं की, ‘आम्हाला डिब्रुगढ येथे बॉम्बस्फोट झाल्याची प्रथम माहिती मिळाली. या प्रकरणी तात्काळ चौकशी सुरु करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामागे नेमका कुणाचा हात आहे याचा सध्या आम्ही शोध घेत आहोत.’ तसेच या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप तरी माहिती नाही. या स्फोटानंतर राज्यातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. तसेच पुढील धोके लक्षात घेऊन वाहनांची तपासणी सुरु करण्यात  आली असून संशयित लोकांना देखील ताब्यात घेतले जात आहे.

दरम्यान, आसामच्या दिब्रूगड येथे घडवून आणलेला ग्रेनेड हल्ला आसाममधील बंडखोर संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असाम – इंडिपेंडंट (उल्फा – आय) या संघटनेने घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यासोबतच सर्वसाधारणपणे अशा संघटना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बंदचे आवाहन करीत असतात, असेही पोलिसांनी म्हटले आहे.


हेही वाचा – LIVE : भारतीय प्रजासत्ताक दिन २०२० – पंतप्रधानाची राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट


 

First Published on: January 26, 2020 11:08 AM
Exit mobile version