असं लग्न जिथे ‘झाडं’च आहेत नवरा- नवरी…

असं लग्न जिथे ‘झाडं’च आहेत नवरा- नवरी…

प्रातिनिधिक फोटो

माणसांप्रमाणेच प्राण्यांचंही आपापसांत लग्न लावण्याची अनेक ठिकाणी प्रथा आहे. काही गावांत तर पाऊस पडावा म्हणून बेडकांचं लग्न लावण्याती प्रथा आहे. मात्र, दोन झाडांचं एकमेकांशी लग्न लावून दिल्याचं तुम्ही ऐकलं आहात का? आपल्याकडे तुळशीच्या लग्नात तुळशीच्या झाडाचं बाळकृष्णाशी लग्न लावलं जातं. मात्र, पश्चिम बंगालच्या एका गावात चक्क दोन झाडांमध्ये लग्न लावण्यात आलं आहे. पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकातापासून १५ किलोमीटरवर असलेल्या सोडेपूर येथे दोन झाडांचा अनोखा लग्नसोहळा नुकताच पार पडला. मंडप सजला होता, वाजंत्री वाद्य वाजवत होते, लोकं जमली होती, सगळीकडे फुलांची आरास होती आणि नवरा-नवरी म्हणून चक्क दोन ‘झाडं’ सजली होती. बारा वर्षांचं ‘प्रणय’ नावाचं वडाचं झाड आणि दहा वर्षांचं ‘देबराती’ नावाचं पिंपळाचे झाड यांची यावेळी लग्नगाठ बांधली गेली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाचा अधिकाधिक प्रसार व्हावा तसंच भूतलावरुन कमी होत असलेली झाडांची संख्या अबाधित राहावी आणि वाढावी, या उद्देशातून हा अनोखा विवाह सोहळा लावण्यात आला. यावेळी पाहुणे म्हणून गाव परिसरातील सुमारे २ हजार लोक उपस्थित होते. ‘वधु-वरांची काळजी आपण सर्वांनीच घ्यायची असून, त्यांचा संसार अधिक फुलवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे,’ असं आवाहन त्यावेळी करण्यात आलं.

लग्नासाठी म्हणून खास प्रणयला (झाड) धोतर आणि कुर्ता घालण्यात आला होता. तर देबरातीला (झाड)  साडी नेसवण्यात आली होती. बंगाली प्रथेप्रमाणे शंखनाद करून लग्नविधीला प्रारंभ करण्यात झाला आणि पारंपारिक बंगली संस्कृतीप्रमाणेच हा विवाह सोहळा संपंन्नदेखील झाला. विवाहानंतर वऱ्हाड्यांसाठी खास बंगाली जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दोन झाडांचा अनोखा विवाह सोहळा
First Published on: March 22, 2019 2:35 PM
Exit mobile version