अर्णब गोस्वामींना आंतरराष्ट्रीय दणका; नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २० हजार पौंडचा दंड

अर्णब गोस्वामींना आंतरराष्ट्रीय दणका; नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २० हजार पौंडचा दंड

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आंतराष्ट्रीय स्तरावर दणका बसला आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. आक्षेपार्ह भाषा, द्वेषयुक्त भाषण आणि अपमानास्पद मजकूर प्रसारण केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ऑफकॉमने या कडक बाबींबद्दल माहिती देताना प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये ऑफकॉमने असे म्हटले आहे की, त्यांनी ६ सप्टेंबर, २०१९ रोजी प्रसारित करण्यात आलेल्या वाहिनीच्या ‘पूछता है भारत’ कार्यक्रमात वृत्तनिवेदक रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी व्यक्त केलेले मत आणि काही पाहुण्यांनी प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केले. रिपब्लिक इंडियाला यूकेमध्ये प्रसारित करण्याचा परवाना असणार्‍या वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडवरही हे निर्बंध लादण्यात आले आहेत. कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडून कारवाईची माहिती देत सांगण्यात आले आहे की, “ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. शिवाय, पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रिपब्लिक वाहिनीला ठोठावण्यात आलेला दंड हा चंद्रयान-२ शी संबंधित कार्यक्रमासाठी आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानात प्रगती करत असताना पाकिस्तान दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असल्याची तुलना या कार्यक्रमात करण्यात आली होती. शिवाय, या कार्यक्रमात आलेल्या पाहूण्यांनी देखील पाकिस्तानमधील नागरिकांना आतंकवादी म्हटल्याचे ऑफकॉमने म्हटले आहे. आम्ही वैज्ञानिक बनवतो तर तुम्ही आतंकवादी बनवता, अशी टीका अर्णब गोस्वामी यांनी कार्यक्रमात केली होती.

कलम ३७० आणि भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरही चर्चा झाली. अहवालात म्हटले आहे की गोस्वामी आणि काही पाहुण्यांनी असे म्हटले होते की सर्व पाकिस्तानी अतिरेकी आहेत. चॅनलचे सल्लागार संपादक गौरव आर्य म्हणाले, “त्यांचे वैज्ञानिक, डॉक्टर, नेते, राजकारणी सर्व दहशतवादी आहेत. त्यामचे खेळाडू देखील. हे संपूर्ण राष्ट्र दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवादी युनिटमध्ये काम करत आहात.”

 

First Published on: December 23, 2020 12:08 PM
Exit mobile version