ब्रिटन, स्कॉटलॅंडमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा

ब्रिटन, स्कॉटलॅंडमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संपुर्ण इंग्लंडमध्ये सोमवारपासूनच कडक लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा नवा व्हेरीएंट हा अधिक वेगाने संक्रमित होत असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला. नव्या संसर्गाचा वाढता धोका, वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या केसेस आणि रूग्णांची उपचारासाठी वाढती गर्दी पाहूनच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. कोरोनाच्या नव्या संसर्गामुळे वाढता धोका पाहता आपल्याला अधिकाधिक गोष्टी करणे गरजेचे आहे. म्हणूनच सरकार म्हणून आम्ही विनंती करत आहोत की जनतेने कृपया घरीच थांबावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

जनतेला फक्त वैद्यकीय गोष्टींसाठी आणि अत्यावश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठीच परवानगी देण्यात आली आहे. फक्त अधिकृत परवानगीनेच आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे ही फक्त सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळतच सुरू ठेवण्यात आली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत हा लॉकडाऊन कायम राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्कॉटलॅंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. स्कॉटलॅंडच्या पंतप्रधान निकोल स्ट्रर्जिऑन यांनी जनतेला संपुर्ण जानेवारी महिन्यात घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. स्कॉटिश संसदेत घोषणा करत सांगितले की परिस्थिती आता खूपच गंभीर बनलेली आहे. त्यामुळेच जनतेला कोरोनाशी संबंधित लॉकडाऊनचे निकष पाळावेच लागतील. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: January 5, 2021 8:26 AM
Exit mobile version