Ukraine : युक्रेनकडून अखेर दिलगिरी व्यक्त करत हिंदूंच्या भावना दुखावणारे ‘ते’ ट्वीट डिलिट

Ukraine : युक्रेनकडून अखेर दिलगिरी व्यक्त करत हिंदूंच्या भावना दुखावणारे ‘ते’ ट्वीट डिलिट

कीव : वर्षभराहून अधिक काळ रशियासोबत युद्ध सुरू असतानाच देवी कालीसंदर्भात (Hindu goddess Kali) केलेल्या पोस्टमुळे युक्रेनच्या (Ukraine) अडचणी वाढल्या आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक ट्वीट करत, देवी कालीचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केले होते. भारतासह जगभरातील हिंदू समाजाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण कृतीबाबत युक्रेनच्यावतीने खेद व्यक्त करण्यात आला आहे. युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी या घटनेबाबत ट्वीट करत माफी मागितली आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्वीटमध्ये देवी काली चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली होती आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. युक्रेन आणि तेथील नागरिकांना भारताच्या अनोख्या संस्कृतीबद्दल आदर आहे. हा फोटो आधीच काढून टाकण्यात आला आहे. युक्रेन भारतासोबत परस्पर आदराच्या भावनेने मैत्री आणि सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे युक्रेनच्या प्रथम उपपरराष्ट्र मंत्री एमिने झेपर (Emine Dzheppar) यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले आहे.

स्फोटामुळे झालेल्या धुराच्या वरती देवी कालीचे कथित चित्र, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये दर्शविली आहे. माता कालीच्या गळ्यात कवटींची माळ आहे. @DefenceU ट्विटर हँडलने “वर्क ऑफ आर्ट” या शीर्षकाखाली हे चित्र पोस्ट केले आहे. यानंतर युक्रेनच्या या पोस्टवर भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक भारतीय ट्वीटर युझर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि फोटो काढून टाकण्याची मागणी केली. लोकांनी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर असंवेदनशीलता आणि भारतीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यााबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणीही अनेकांनी केली. त्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हे ट्वीट डिलीट केले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने 30 एप्रिल रोजी पोस्ट केला होता. आता हा फोटो डिलीट केल्यानंतरही सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

First Published on: May 2, 2023 11:46 AM
Exit mobile version