आसाममध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून ५ तरुणांची निर्घृण हत्या

आसाममध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून ५ तरुणांची निर्घृण हत्या

उल्फा या दहशवादी संघटनेने ५ तरुणांची केली हत्या

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यामध्ये गुरुवारी सध्याकाळी पाच बांग्लाभाषी तरुणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. उल्फा म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या दहशतवादी संघटनेने या तरुणींची हत्या केल्याचे समोर आले आहे. उल्फा संघटनेच्या दहशतवाद्यांनी या सहाही तरुणांचे आधी अपरहण केले त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र उल्फाने तरुणांच्या हत्येच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ तिनसुकिया जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात आला आहे.

अशी घडली घटना

तिनसुकिया जिल्ह्यातल्या खेरबाडी गावातील ही घटना आहे. असे सांगितले जाते की, सहा तरुण एका दुकानात बसले होते. त्याच दरम्यान उल्फाचे दहशतवादी त्याठिकाणी आले त्यांनी या सहाही जणांचे अपहरण करुन घेऊन गेले. ब्रम्हपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर या सर्वांना घेऊन जाण्यात आले. या दहशतवाद्यांनी सहाही तरुणांना एका रांगेत उभे केले. त्यानंतर एका एकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर पोलीस आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन जखमी असलेल्या तरुणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र एकाचा हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. आसाम पोलीस खात्यातील एडीजीपी मुकेश अग्रवाल यांनी या हल्ल्यामागे उल्फा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले.

दोषींवर कारवाईची मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. यासंदर्भात ट्विट करुन त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. श्यामलाल बिस्वास, अनंत बिस्वास, अभिनाश बिस्वास, सुबोध दास यांची हत्या झाली आहे. हे सगळं एनसीआरमुळेच तर झालं नाही ना, अशी शंकाही ममतांनी उपस्थित केली आहे. या हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

उल्काने हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी मंत्री केशव महंत आणि तपन कुमार गोगोई यांना घटनास्थळी भेट देण्यास रवाना केले आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी रात्री ८.५५ वाजता घडली. धोला-सादिया पुलापासून सहा किलोमीटरवर ही घटना घडली आहे. ही जागा आसा-अरुणाचलप्रदेशच्या सीमेजवळ आहे. आतापर्यंत उल्फाने हत्येची जबाबदारी स्विकरली नाही. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

हत्येविरोधात बंदची हाक

उल्फाच्या दहशतवाद्यांनी पाच तरुणांच्या केलेल्या हत्येविरोधात पश्चिम बंगालच्या विविध ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कोलकत्ता, सिलिगुरी, अलिपुरदौरा, जलपायगुडी, नौएडा याठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

First Published on: November 2, 2018 10:23 AM
Exit mobile version