Lockdown 5.0? गृहमंत्री अमित शाह यांची सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Lockdown 5.0? गृहमंत्री अमित शाह यांची सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे. लॉकडाऊनच्या चारही टप्प्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होण्याऐवजी वाढच झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुढे वाढवायचा की नाही? यावर केंद्र सरकार लवकरच भूमिका जाहीर करणार आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांनी राज्यांचे मत जाणून घेतले.

२४ मार्च रोजी २१ दिवसांसाठी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ३ मे आणि १७ मे रोजी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली. आता लॉकडाऊनला दोन महिने पुर्ण होत आहेत. अनके राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणावी अशी मागणी केली आहे. तसेच काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्यामुळे अर्थचक्र सुरु करण्यासाठी त्या राज्यांना प्रयत्न करायचे आहेत.

गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये मोकळीत द्यायची झाल्यास बाधित क्षेत्र कोणते आणि सुरक्षित क्षेत्र कोणती याची माहिती घेतली. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन संपण्याच्या आधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असत. लॉकडाऊनचे नियम काय असले पाहीजेत, याची सूचना गृहमंत्रालयाकडूनच काढली जाते. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी हा संवाद साधला होता. अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी खबरदारीची उपाय घेत, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याची शक्यता या बैठकीनंतर वर्तविण्यात येत आहे.

First Published on: May 29, 2020 9:12 AM
Exit mobile version