IIT Delhi नं बनवलं जगातलं सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट! किंमत फक्त…

IIT Delhi नं बनवलं जगातलं सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट! किंमत फक्त…

जगभरात कोरोनाचा फैलाव आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्या ही एक महत्त्वाची बाब ठरत आहे. मात्र, कोरोना टेस्टिंग किटची किंमत जास्त असल्यामुळे ही चाचणी सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली असतानाच आता IIT Delhi ने जगात सर्वात स्वस्त असं कोरोना टेस्टिंग किट विकसित केलं आहे. या किटचं लाँचिंग आज सकाळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल आणि या खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. खुद्द रमेश पोखरियाल निशंक यांनीच ही माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे.

रमेश पोखरियाल यांच्या हस्ते हे टेस्टिंग किट लाँच करण्यात आलं, तेव्हा ते तयार करणारे IIT Delhi मधले तज्ज्ञ देखील तिथे उपस्थित होते. Newtech Medical कंपनीकडे Corosure या नावाने हे टेस्टिंग किट लाँच करण्यात आलं आहे. या टेस्टिंग किटची संपूर्ण किंमत फक्त ६५० रुपये इतकी आहे. त्यामुळे सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या इतर चाचण्यांपेक्षा ही चाचणी स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात होऊ शकणार आहे. ‘ही चाचणी स्वस्त झाल्यामुळे चाचण्या होण्याचं प्रमाण आणि चाचण्यांची किंमत यामध्ये खूप मोठा बदल घडणार आहे. या किटच्या मदतीने महिन्याला २० लाख चाचण्या करणं शक्य होणार आहे. तेही अगदी वाजवी दरामध्ये’, अशी प्रतिक्रिया यावेळी IIT Delhiचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी दिली.

First Published on: July 15, 2020 6:54 PM
Exit mobile version