UPA: सोनिया गांधींच्या निवासस्थानी विरोधकांचे मंथन, शरद पवारांकडे ममतांची समजूत काढण्याची जबाबदारी?

UPA: सोनिया गांधींच्या निवासस्थानी विरोधकांचे मंथन, शरद पवारांकडे ममतांची समजूत काढण्याची जबाबदारी?

ममता बॅनर्जींना शरद पवारांचा पाठिंबा, तिसऱ्या आघाडीसाठी दिल्ली किंवा मुंबईत होणार बैठक

विरोधकांच्या एकजूटीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १२ खासदारांच्या निलंबनावर चर्चा झाली तसेच यूपीए आणि देशातील सर्व विरोधी पक्षांच्या एकजूटीविषयी चर्चा झाली. यूपीएमध्ये सामील होण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समजवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ममतांना समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्राविरोधात सक्षम आघाडी निर्माण करण्यासाठी सोनिया गांधी यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. यूपीएवर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे आता काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना राज्यसभा चेयरमन व्येंकैया नायडू यांच्यासोबत चर्चा करुन १२ खासदारांच्या निलंबनावर मार्ग शोधण्यास सांगितले आहे. तसेच या बैठकीत सर्व राज्यांतील विरोधकांना एकजूट करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी याविषयी देखील चर्चा झाली आहे.

शरद पवारांकडे मोठी जबाबदारी

देशात काँग्रेसला वगळून सक्षम आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत आहेत. त्यांनी काँग्रेस आणि यूपीएवर देखील प्रश्न निर्माण केले आहेत. यामुळे काँग्रेससोबत आणि यूपीएमध्ये सामील होण्यासाठी ममता बॅनर्जीची समजूत काढण्यावर चर्चा झाली आहे. ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे दिली आहे. काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याला विरोधी पक्षाचे नेते सहमत नाहीत. तसेच प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी रणनीति आखण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली आहे.

दिल्लीतील विरोधी पक्षांच्या बैठकीला खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, डीएमकेचे टीआर बालू, वामचे नेते सीताराम येचुरी, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, आणि राष्ट्रीय प्रवक्ते फारुक अब्दुल्ला उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनासुद्धा निमंत्रण दिले होते परंतु तब्येतीच्या कारणास्तव  उपस्थित राहू शकले नाही. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेसशी असलेल्या तणावात्मक संबंधांमुळे आमंत्रित करण्यात आले नाही.


हेही वाचा : सोनिया गांधी यांच्या घरी विरोधकांची बैठक; शरद पवार, राऊत, फारुख अब्दुल्ला, खर्गे उपस्थित

First Published on: December 15, 2021 11:18 AM
Exit mobile version