मिशन शक्ती’ आणि अंतराळ कचऱ्याबद्दल अमेरिकेचं म्हणणं काय?

मिशन शक्ती’ आणि अंतराळ कचऱ्याबद्दल अमेरिकेचं म्हणणं काय?

प्रातिनिधिक फोटो

मिशन शक्ती अंतर्गत काल भारताने आपल्या अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानातील मोठी कामगिरी केली. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राचा वापर करून भारताने एक ‘लाईव्ह’ उपग्रह पाडण्याची यशस्वी चाचणी घेतली. इतकेच नव्हे, तर या तंत्रज्ञानामुळे अंतराळात कचरा होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. भारताच्या या चाचणीबद्दल विविध देशांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात अमेरिकेने दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने यावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली माहिती बघितली. भारताशी असलेल्या मजबूत राजनैतिक भागीदारीचा भाग म्हणून आम्ही भविष्यात वैज्ञानिक, तांत्रिक आणि सुरक्षेच्या मुदद्यावर पुढे जाण्यासाठी आमचा सहयोग सुरू असेल.

अंतराळातील कचरा ही सध्या शास्त्रज्ञांसाठी मोठी समस्या बनली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेने म्हटलेय की अंतराळातील कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. भारताने केलेल्या परिक्षणादरम्यान अंतराळतील कचऱ्याच्या समस्येचा विचार करण्यात आला, हे भारताचे निवेदनही आम्ही पाहिले.

अमेरिकेच्या या प्रतिक्रियेला महत्त्व असून भविष्यात अंतराळसंशोधनात विशेषत: अंतराळ कचऱ्याचा प्रश्न, सुरक्षा, संशोधन अशा सर्वच बाबतीत भारतीय संशोधन जगासाठी पथदर्शी ठरू शकते.

चीनची प्रतिक्रिया काय होती?
दरम्यान मिशन शक्तीबदद्दल चीनने मात्र सावध प्रतिक्रिया नोंदविली आहे. एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलेय की आम्ही यासंदर्भातील बातम्या पाहिल्या आहेत. प्रत्येक देश अंतराळात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करेल अशी आम्हाला आशा वाटते. भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राचे परीक्षण केल्यानंतर हे तंत्रज्ञान अवगत करणारी महाशक्ती म्हणून भारताचा उदय झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

दरम्यान डीआरडीओचे अध्यक्ष जी सतिश रेड्डी यांनी म्हटलेय की ए-सॅट प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू झाला आणि सहा महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला मोहिमेचे स्वरूप आले. एएनआयने त्यांची सविस्तर प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. ओरिसा येथील बालासोर येथून बुधवारी सकाळी 11.16 मिनिटांनी हे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटात त्याने अवकाशात पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाचा वेध घेतला.

First Published on: March 28, 2019 10:01 AM
Exit mobile version