Vaccine: लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के बचाव – केंद्राची माहिती

Vaccine: लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के बचाव – केंद्राची माहिती

देशात कोरोना लसीकरण मोहीमेला चांगलाच वेग आलाय. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. असले तरीही लसीबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कोणती लस किती प्रभावी याविषयी लोकांना मनात अनेक प्रश्न आहेत. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी कोरोना लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के सुरक्षा मिळते. तर कोरोना लसीचा एकच डोस घेतल्याने  कोरोनापासून ९२ टक्के बचाव होतो,असे डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे. (Vaccine: 98% prevention of corona by taking two doses of vaccine – Center information)  देशात सध्या दररोज जवळपास ५० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.  आज जगभरात कोरोना विरोधी अनेक लसी तयार करण्यात आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची शक्यता फार कमी आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने थैमान घातले आहे. देशात डेल्टा प्लसच्या नव्या विषाणूचे ५६ हून अधिक रुग्ण समोर आले असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील १२ राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील लसीकरण मोहीमेचा वेग आणखी वाढवला आहे.

देशात आतापर्यंत ३४ कोटी ४६ हजारांहून अधिक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा विचार केला असता देशात गेल्या २४ तासात ४४ हजार १११ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ७३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मोठी मदत झाली असली तरी देशात सध्या ४ लाख ९५ हजारांहून अधिक अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा – महाराष्ट्र लसीकरणात अव्वल दीड कोटी जादा लसीचे डोस द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे मागणी

First Published on: July 3, 2021 3:08 PM
Exit mobile version