VBA : वंचितला हवे रोड रोलर, गॅस सिलिंडर किंवा शिट्टी; आघाडीतील प्रवेशावर प्रकाश आंबेडकरांचे नो कॉमेंट्स

VBA : वंचितला हवे रोड रोलर, गॅस सिलिंडर किंवा शिट्टी; आघाडीतील प्रवेशावर प्रकाश आंबेडकरांचे नो कॉमेंट्स

नवी दिल्ली – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दिल्या जाणाऱ्या निवडणूक चिन्हाबाबत ही भेट असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. त्यांनी तीन चिन्हांची मागणी केली आहे, त्यात गॅस सिलिंडर, शिट्टी आणि रोड रोलर यांचा समावेश आहे. यापैकी एक चिन्ह वंचितला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीत सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांनी त्याबाबत मला माहित नाही म्हटले आहे. यामुळे आघाडीसोबतची वंचितची चर्चा आता संपुष्टात आल्याचेच संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र लिहून राज्यातील सात जागांवर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पाठिंबा देईल असे म्हटले होते. त्यांच्या या प्रस्तावावर काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यानंतर आंबेडकरांनी आता निवडणुक आयोगाकडे लोकसभा निवडणुकीसाठी चिन्हाची मागणी केली आहे. त्यांनी गॅस सिलिंडर, शिट्टी, रोड रोलर या चिन्हांचा पर्याय दिला आहे. यापैकी एक चिन्ह त्यांना मिळेल.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने अबकारी धोरण ठरवले होते. तो त्यांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय होता. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला कोर्ट किंवा तपास यंत्रणा आव्हान देऊ शकत नाहीत, मात्र मोदी आणि शहा यांचे सरकार घटनाबाह्य काम करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. केजरीवालांच्या अटकेचा निषेधही त्यांनी केला. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे विविध राज्यांत सरकार आहे. त्यांनीही भाजपविरोधात बोलले पाहिजे, मात्र ते शांत राहतात असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

वंचित बहुजन आघाडी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त प्रकाश आंबेडकरांनी फेटाळले

वंचित बहुजन आघाडी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त प्रकाश आंबेडकरांनी फेटाळले आहे. आमच्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे त्यांनी ट्वीट करुन म्हटले आहे. तसेच वंचितने महाविकास आघाडीकडे सहा जागा मागितल्याची बातमीही खोटी असल्याचे वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले.

आहे.

First Published on: March 22, 2024 1:50 PM
Exit mobile version