त्यानं ८० वर्ष कटिंगच केली नाही; केसांची लांबी पाहून थक्क व्हाल!

त्यानं ८० वर्ष कटिंगच केली नाही; केसांची लांबी पाहून थक्क व्हाल!

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून अनेकांना केस कापण्यासाठी सलून व्यावसायिकच उपलब्ध होत नाहीत. कारण लॉकडाऊनच्या काळात सगळंच बंद असल्यामुळे वाढलेले केस डोक्यावर सांभाळत पुरूष मंडळींना फिरावं लागत आहे. २ किंवा ३ महिने वाढलेले केस जरी असले, तरी ‘किती केस वाढले?’ असं वारंवार ऐकायला लागणारीही मंडळी आपल्याकडे आहेत. मात्र, असा एक पुरुष आहे ज्यानं गेल्या ८० वर्षांत एकदाही कटिंग केलेली नाही. त्यामुळे त्याच्या केसांकडे पाहून ‘किती केस वाढले?’ असा प्रश्न न विचारता लोकं ‘किती केस वाढले!’ असं आश्चर्यच व्यक्त करतात. व्हिएतनाममध्ये राहणारे गुयेन व्हॅन चिएन (Nguyen Van Chien) यांनी गेल्या ८० वर्षांमध्ये एकदाही कटिंग केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या वाढत्या केसांची लांबी आता तब्बल ५ मीटर इतकी झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की गुयेन व्हॅन चिएन यांचं नक्की वय किती?

गुयेन व्हॅन चिएन यांचं आत्ताचं वय आहे तब्बल ९२ वर्ष. म्हणजेच गणितच लावायचं झालं, तर चिएन यांनी याच्या आधी थेट वयाच्या १२व्या वर्षीच कटिंगसाठी सलूनचं तोंड पाहिलं होतं! त्यावर त्यांची अशी धारणा आहे की, ‘मानव ज्या काही गोष्टी घेऊन जन्माला आला आहे, त्यांना आपण धक्का लावता कामा नये’! त्यांचं म्हणणं आहे की, ‘मला वाटतं की जर मी माझे केस कापले, तर मी मरून जाईन. केसांच्या बाबतीत कोणताही बदल करण्याची माझी हिंमत नाही. मी फक्त त्यांचं संगोपन करतो. ते कोरडे राहावेत आणि चांगले दिसावेत म्हणून त्यांना झाकण्यासाठी स्कार्फ वापरतो’.

चिएन यांचे केस एकेकाळी छान काळेभोर, दाट होते. पण एकदा त्यांनी ते सोडले आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून ते मऊ व्हावेत. पण तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की पुन्हा असं काहीही करायचं नाही. त्यांचा दावा आहे की त्यांना एका दिव्य शक्तीने साक्षात्कार देऊन असं न करण्याची ताकीद दिली. तेव्हापासून त्यांनी केस कधीही धुतले किंवा सोडून पुन्हा बांधलेले नाहीत! ‘त्या दिवशी मी माझ्या केसांना स्पर्श केला आणि एका रात्रीत ते खूप जाड झाले. ते आता माझ्या डोक्याला घट्ट चिकटलेले आहेत. त्यांचं माझ्याप्रमाणेच स्वतंत्र अस्तित्व आहे’, असं चिएन यांचं म्हणणं आहे.

पण बाकी काहीही असलं, तरी चिएन यांच्या श्रद्धेचा भाग सोडला, तर त्यांचे हे ५ मीटर लांब आणि कधीही न सोडलेले केस हा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे हे मात्र नक्की!

First Published on: August 26, 2020 8:19 PM
Exit mobile version