माल्ल्या आणि राहुल यांच्यात खोटे बोलण्याची जुगलबंदी – पियुष गोयल

माल्ल्या आणि राहुल यांच्यात खोटे बोलण्याची जुगलबंदी – पियुष गोयल

फाईल फोटो

विजय माल्ल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्यानंतर आणि त्याच्या लंडनमधील वक्तव्यानंतर कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटली यांच्यावर आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे. माल्ल्या आणि राहुल यांच्यात खोटे बोलण्याची जुगलबंदी सुरु आहे असं ते म्हणाले. तर कॉंग्रेसचे आरोप ही खोटे बोलण्याची खाणच असल्याचा टोला देखील केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लगावला आहे.

विजय माल्ल्याला यांनी केली मदत

विद्यमान सरकारने माल्ल्याला कर्ज वा कोणतीही सूट दिलेली नसून जे काही झाले ते आधीच्या सरकारच्या(काँग्रेस) काळात झाले आहे. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच विजय माल्ल्याला मदत केली असल्याचा घणाघात गोयल यांनी केला आहे. त्याचप्रमाणे २०१० पासून यूपीएने माल्ल्या आणि किंगफिशरला दिलासा देण्यासाठी देखील नियम मोडल्याचा आरोप गोयल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पक्षाने देशाचे पैसे लुटले

ज्या कुटुंबाने आणि पक्षाने देशाचे पैसे लुटले आहेत ते आता खोटे बोलून स्वत:चा बचाव करत असल्याचा आरोप देखील गोयल यांनी केला आहे. त्याचबरोबर यूपीए सरकारने विजय माल्ल्याला कर्ज का दिले? रिझर्व्ह बँकेवर दबाव का टाकण्यात आला? यूपीए सरकारने माल्ल्याला सवलत का दिली? असे सवाल गोयल यांनी राहुल गांधी यांना केले आहेत. या सर्व प्रश्नांची राहुल गांधींनी उत्तरे द्यावीत. तसेच माल्ल्या जे काही बोलतो आहे ते गांभीर्याने घेऊ नका. प्रत्येक आरोपी आपला गुन्हा लपवण्यासाठी काहीही बोलत असतो. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नसल्याचे देखील गोयल म्हणाले.

मल्ल्या आणि जेटली यांची भेट

विजय माल्ल्या यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचे आपण पाहिले असल्याचा पी. एल. पुनिया यांचा दावा आहे. यावर गोयल म्हणाले की पुनिया आपले वक्तव्य वारंवार बदलत असतात. तर त्यांना अडीच वर्षांनंतर या भेटीची आठवण कशी काय आली? ते स्वत: गोंधळलेले असतात. ते कधी म्हणतात बसून चर्चा केली तर कधी म्हणतात चालता चालता चर्चा केली. शिवाय पुनिया त्यावेळी तिथे काय करत होते याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे असा देखील गोयल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ते कोणाच्या दबावात असे वक्तव्य करत आहेत ते स्पष्ट सांगावे असे देखील गोयल त्यांना म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी स्वत:च राजीनामा दिला पाहिजे

जेटली यांचा राजीनामा मागण्यापेक्षा नॅशनल हेराल्डप्रकरणी झालेल्या आरोपांमुळे राहुव गांधींनी स्वत:च राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका गोयल यांनी केली आहे.

First Published on: September 13, 2018 10:28 PM
Exit mobile version