भारतात येऊन कर्ज फेडण्यास विजय मल्ल्या तयार

भारतात येऊन कर्ज फेडण्यास विजय मल्ल्या तयार

विजय मल्ल्या

ब्रिटनमध्ये असलेल्या विजय मल्ल्यानं एक पत्रक जारी करून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय बँकांचं कोट्यावधी रुपये कर्ज बुडवून विदेशात विजय मल्ल्या पसार झाला होता. मात्र, बँकांची कर्ज फेडण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला असून मला कर्ज बुडवणाऱ्यांचा ‘पोस्टर बॉय’ केल्याचा आरोप या पत्रकातून विजय मल्ल्यानं केला आहे. हे सर्व राजकीय हेतूनं प्रेरित असल्यास मी काहीच करू शकत नाही असंही त्यानं म्हटलं आहे.

मल्ल्यानं मांडली आपली बाजू

युबीएचएल (युनायटेड ब्र्यूव्हरीज होल्डिंग लि.) आणि मल्ल्यानं २२ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर १३,९०० कोटी कर्ज फेडण्यासाठी तयार असल्याचा अर्ज दाखल केला असल्याचं मंगळवारी बंगळूरुमधील त्याच्या कार्यालयाद्वारे सादर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. न्यायालयीन पर्यवेक्षणान्वये मालमत्तेची विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती या अर्जाद्वारे मल्ल्यानं केली आहे. तर ‘भारतातील बँकांचं कर्ज फेडण्यासाठी तयार असून मी सगळेच प्रयत्न केले तरीही मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवण्यात आलं. माझं नाव घेतल्यानंतर लोक भडकतात. माझी प्रतिमा बिघडवण्यात आली. हे सर्व राजकीय हेतूनं केलं असेल तर मी यात काहीच करू शकत नाही.’ असंही या पत्रकामध्ये मल्ल्यानं स्पष्ट केलं आहे.

दोन वर्षानं सोडलं मौन

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री आणि एसबीआयचे अध्यक्ष यांना पत्र पाठवून याविषयी चर्चा करण्यास सांगितलं होतं. पण कोणाकडूनही उत्तर न आल्यामुळं आता ही पत्रं सार्वजनिक करत असल्याचं आपल्या ट्विटमध्ये विजय मल्ल्यानं सांगितलं आहे. दोन वर्षानंतर मल्ल्यानं मौन सोडलं आहे.

 

First Published on: June 26, 2018 7:49 PM
Exit mobile version