बजरंग दल आणि विहिंप धार्मिक अतिरेकी – CIA

बजरंग दल आणि विहिंप धार्मिक अतिरेकी – CIA

विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते

अमेरिकेची गुप्तचर संघटना CIA (सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी)ने बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला धार्मिक अतिरेकी संघटना असल्याचे म्हटले आहे. यामुळे विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन देशभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सीआयएने आपल्या वार्षिक वर्ल्ड फॅक्ट बुकमध्ये याबाबत नोंद केली आहे.

भारतातील राजकीय दबावगट

सीआयएने राजकीय दबाव टाकणाऱ्या जगभरातील संघटनांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच आरएसएस, हुर्रियत कॉन्फर्न्स, जमियत उलेमा-ए-हिंद या संघटना राजकारणावर दबाव टाकण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. सीआयएने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटन, जम्मू आणि काश्मीरच्या हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी संघटना आणि जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेला धार्मिक संघटना असल्याचे सांगितले आहे. या संघटना कधीच राजकारणात उतरत नाही, मात्र राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी दबावगट म्हणून काम करत असल्याचे सीआयएने म्हटले आहे.

काय आहे हे फॅक्टबुक

सीआयए संस्था फॅक्टबुकमध्ये जगभरातील २६७ देशांची माहिती गोळा करते. दरवर्षी ४ जूनला ही संस्था त्यांचे वर्ल्ड फॅक्टबुक प्रसिध्द करते. ही माहिती अमेरिका सरकारला दिली जाते. १९६२ साली अशाप्रकारे माहिती गोळा करण्यास सीआयएने सुरुवात केली.

फेक न्यूज असल्याचा भाजपचा दावा

भाजप संवाद सेलचे माजी राष्ट्रीय संयोजक खेमचंद शर्मा यांनी सीआयए या संस्थेने केलाला दावा फेटाळून लावलाय. वर्ल्ड फॅक्टबुकमध्ये छापलेले वृत्त खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शर्मा यांनी शुक्रवारी ट्विट करुन सीआयएविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

First Published on: June 15, 2018 9:14 PM
Exit mobile version