मोदींना सत्तेतून ‘बेरोजगार’ करण्याची गरज – राहुल गांधी

मोदींना सत्तेतून ‘बेरोजगार’ करण्याची गरज – राहुल गांधी

देशातील बेरोजगारीचा अहवाल समोर आला असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ‘हुकूमशाहा मोदी यांनी आता सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे’, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी  याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘वर्षाला दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन हुकूमशाहने दिले होते. मात्र, सत्तेतील त्यांच्या ५ वर्षांनतर आलेल्या एका अहवालाने सर्वांसमोर भीषण वास्तव समोर आलं आहे.’ राहुल गांधी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे. सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ‘बेरोजगारीच्या’ मुद्द्यावरुन मोदी सरकारला टार्गेट केलं आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील २०१७-१८ या वर्षातील बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के इतका आहे. अहवालानुसार, १९७२-७३ पासून ते आजपर्यंतचा हा बेरोजगारीचा सर्वाधिक दर आहे. नेमक्या याच मुद्द्याला हात घालत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टोला हाणला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की ‘देशात तरुणांसाठी आता नोकऱ्याच नाहीत. अहवालातून बेरोजगारासंदर्भातील भीषण परिस्थिती समोर आली आहे. २०१७- १८ या वर्षात ६.५ कोटी तरुण बेरोजगार होते, आता बेरोजगारीचा दर ४५ वर्षांमधील सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोदींची सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे’. सोशल मीडियावरुन ही टीका करतेवेळी त्यांनी #HowsTheJobs असा हॅशटॅग वापरला आहे.

First Published on: January 31, 2019 4:49 PM
Exit mobile version