जन्माष्टमी उत्सवादरम्यान मथुरेत गालबोट, चेंगराचेंगरीत दोन भाविकांचा मृत्यू

जन्माष्टमी उत्सवादरम्यान मथुरेत गालबोट, चेंगराचेंगरीत दोन भाविकांचा मृत्यू

मथुरा – भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेल्या मथुरेत जन्माष्टमीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून ५५ मिनिटांनी हा अपघात घडला. मंदिरात मंगला आरती सुरू असताना चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीचा मोठा उत्सव केला जातो. अनेक कृष्णभक्त या जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी मंदिरात येत असतात. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदाच्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला या मंदिरात तब्बल दोन लाखांहून अधिक भाविक आले होते. पहाटे चार वाजता येथील मंगला आरतीला प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली असून दुर्घटना घडली आणि दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर, सहाजण जखमी असल्याचं म्हटलं जातंय.

मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या वेळी मथुरेत तुफान गर्दी असते. वृंदावन येथील जवळपास ८४ किमी अतंरावर असलेल्या सर्वच मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. यावेळी जन्माष्टमीच्या वेळी संपूर्ण मथुरेत जवळपास ५० लाख भाविक आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहराच्या क्षमतेपेक्षा जास्त नागरिक एकावेळी एकत्र आल्याने मथुरेत गर्दी झाली होती. परिणामी बांके बिहारी मंदिरातही गर्दी झाली. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जातंय.

First Published on: August 20, 2022 9:26 AM
Exit mobile version