रेल्वे प्रशासनाचे जेवण तयार होताना पहा लाईव्ह

रेल्वे प्रशासनाचे जेवण तयार होताना पहा लाईव्ह

आयआरसीटीसीचे किचन

रेल्वेचे प्रवासी आता त्यांच्यासाठी जे जेवण शिजवलं जातं, ते लाईव्ह पाहू शकतात. इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) किचनमधून जेवणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. भारतीय रेल्वेने यासाठी पुढाकार घेतला आहे. रेल्वेमधील जेवणाचा दर्जा उंचावणे हे या प्रयोगामागचे मुख्य उद्दीष्ट आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांच्याहस्ते आज या नव्या प्रयोगाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासह त्यांनी नोएडा येथील रेल्वेच्या स्वयंपाकघराची पाहणी केली. या स्वयंपाक घरात तयार करण्यात आलेलं जेवण दररोज १० हजार लोक खातात. राजधानीच्या १७ एक्सप्रेस तसचे दुरांतो आणि शताब्दीच्या सर्व एक्सप्रेसमध्ये येथे तयार करण्यात आलेलं जेवण दिलं जातं.

रेल्वेच्या कामांत पारदर्शकता येणार

लाईव्ह स्ट्रीमिंगसह प्रवासी आता किचनमध्ये शिजणाऱ्या जेवणाचा दर्जादेखील तपासू शकतात. हे लाईव्ह स्ट्रीमिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरील गॅलरी या सेक्शनमध्ये सर्वजण पाहू शकतात. रेल्वेच्या सर्व कामकाजामध्ये पारदर्शकता यावी यादृष्टीने हे पाऊल उचलल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे, असे केल्याने प्रवाशांमध्ये रेल्वेच्या जेवणाबाबतची सांशकता दूर होईल, त्यामुळे रेल्वेच्या जेवनाची मागणी वाढेल, अशी आशा रेल्वेने व्यक्त केली आहे.

रेल्वेचे जेवण खराब असते का?

कॅगच्या अधिकाऱ्यांनी २०१७ साली रेल्वेच्या विविध स्वयंपाक घरांची व जेवणाची पाहणी केली होती. यावेळी अनेक सोयी-सुविधा दिल्याचा टेंभा मिरवणाऱ्या भारतीय रेल्वेत प्रवाशांना खाण्यायोग्य जेवण मिळत नसल्याचा खुलासा कॅगने अापल्या अहवालात केला होता. कॅगच्या या अहवालामुळे भारतीय रेल्वेच्या स्वयंपाकघरांचे पितळ उघडे पडले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन जेवणाचा दर्जा चांगला असल्याचे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

First Published on: July 6, 2018 7:39 PM
Exit mobile version