Weather Update : देशात लहरी हवामान; पर्वतीय भागात हिमवृष्टी, दिल्लीत पावसाचा अंदाज

Weather Update : देशात लहरी हवामान; पर्वतीय भागात हिमवृष्टी, दिल्लीत पावसाचा अंदाज

Weather Updates

Weather Update : नवी दिल्ली – हिवाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये असंतुलित हवामान आहे. त्यातच, आता वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिमी हिमालयातील विभागात हलक्या ते मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर-पश्चीम भारतात पुढच्या ४८ तासांत तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीचे वैज्ञानिक नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ५-६ दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरांत गारवा कमी होणार आहे. आज दिल्लीत सकाळी धुकं पसरलं होतं. त्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये दृष्यमानता कमी झाली होती. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्चनुसार दिल्ली एअरपोर्टवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८० नोंदवण्यात आला होता.

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिवसा किमान तापमान ९ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. आज वातावरणात धुके पसरल्याने इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाने विमान प्रवाशांसाठी फॉग अलर्ट जारी केला होता. विमान उड्डाणांबाबत माहिती घेण्याकरता संबंधित एअरलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन एअरपोर्टकडून करण्यात आले होते.

सोमवारी काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे हिमवृष्टी झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काश्मीर खोऱ्याचा संपर्क तुटला होता. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथेही सामान्य लोकांचं जनजीवन ठप्प झालं होतं. या राज्यातील अनेक भागांत हिमवृष्टीमुळे वीज आणि पाण्याचा पुरवठाही खंडीत झाला होता. शुक्रवारपर्यंत येथे असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात तापमान तेजीने घटत आहे. तिथे किमान सात ते कमाल १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आलं आहे. येत्या तीन दिवसांपर्यंत येथे वातावरणात असाच गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या राज्यात होणार पाऊस

तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराइकल, केरळ आणि माहे येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, उद्या १ फेब्रुवारी रोजी तमिळनाडूच्या सुदूर येथे पावसाचा अंदाज आहे.

First Published on: January 31, 2023 4:53 PM
Exit mobile version