दाऊद आणि हाफिज सईदबद्दल विचारताच, पाकची बोलती बंद

दाऊद आणि हाफिज सईदबद्दल विचारताच, पाकची बोलती बंद

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद हे दोघे भारतातील बहुतांश दहशतवादी कारावायांचे मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. या दोघांनाही पाकिस्तानने आश्रय दिला असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणेचे (एफआयबी) महासंचालक मोहसिन भट यांना या दोघांबद्दल प्रश्न विचारला असता त्यांची बोलती बंद झाली.

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे मंगळवारी आयोजित इंटरपोलच्या 90व्या महासभेसाठी मोहसिन भट आले होते. तेव्हा एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद यांना भारताच्या हवाली करणार का, असे मोहसिन भट यांना विचारले असता त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध पूर्वीपासूनच ताणलेले आहेत. त्यातच जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटविणे, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हवाईहल्ला यामुळे उभय देशातील संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानने वारंवार संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे अधिकारी भारतात इंटरपोलच्या 90व्या महासभेला उपस्थित होते.

भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अलीकडेच कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर 25 लाख रुपयांचे बक्षीस लावले आहे. दाऊदचा हस्तक छोटा शकीलवरही एनआयएने 20 लाख रुपयांचे बक्षीस लावले आहे. त्यांच्या आणखी तीन हस्तकांवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले आहे.

दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवायांमधे सहभागी होत असून लष्कर ए तोयबा, अल कायदा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांसाठी काम करत आहेत. या गुन्हेगारांविषयी माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस देण्याचं एनआयएनं जाहीर केले आहे.

First Published on: October 18, 2022 9:31 PM
Exit mobile version