तामिळनाडू कोण जिंकणार ?

तामिळनाडू कोण जिंकणार ?

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये येत्या १८ एप्रिलला दुसर्‍या टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. येथील जनता नेमके कोणत्या पक्षाच्या पदरात मतांचे माप टाकेल, याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांना मुश्किल झाले आहे. अण्णाद्रमुक पक्षाच्या जयललिता आणि द्रविड मुनेत्र कझगम पक्षाचे करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एकप्रकारे पोकळी निर्माण झाली आहे. सध्या तामिळनाडूत अण्णाद्रमुक पक्षाची सत्ता आहे. मात्र अण्णाद्रमुक पक्षाकडे नेतृत्त्वच राहिलेले नाही. त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाचे कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत. जयललिता गेल्यानंतर त्यांना कार्यक्रम देणारा, त्यांच्या समस्यांकडे आपुलकीने पाहून त्या सोडवणारा नेता नसल्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाचे अनेक कार्यकर्ते निष्क्रिय झालेले आहेत. त्याचा फटका या पक्षाला लोकसभा निवडणुकीत बसणार हे निश्चित आहे.

मात्र अण्णाद्रमुकही ही परिस्थिती असताना द्रमुक पक्षात मात्र सर्व काही आलबेल नाही. या पक्षाचे नेते करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुक पक्षातही एकप्रकारे पोकळी आली आहे. त्यातच द्रमुक पक्षाने काँग्रेसशी केलेली युती त्यांच्या कार्यकर्त्यांना फारशी आवडलेले नाही. द्रमुकचे नवे नेते स्टॅलिन यांच्या मनमानी कारभाराला द्रमुक पक्षाचे कार्यकर्ते वैतागलेले आहेत. त्यामुळे द्रमुकही निवडणुकीत कितीसा प्रभाव पाडेल हे सांगता येत नाही. चित्रपट अभिनेता कमल हासन यांनी मक्कम निधी मय्याम नावाचा आपला वेगळा पक्ष काढला आहे. एक अभिनेता म्हणून कमल हासन जरी चांगला असला तरी त्याचा राजकारणातील प्रभाव अद्याप स्पष्ट व्हायचा आहे. पुन्हा कमल हासनचा पक्ष २०१९ सालची निवडणूक प्रथमच लढत आहे. भाजप आणि काँग्रेस यांचा प्रभाव तामिळनाडूत नाहीच आहे. त्यातच भाजपने अण्णाद्रमुक पक्षाशी केलेली सलगी येथील मतदाराला आवडलेली नाही. त्याचा फटका अर्थातच भाजपला बसणार आहे. तर द्रमुकच्या पुण्याईवर काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.

तामिळनाडूतील मतदार संघ
१ – अराक्कोनम्, २ – चेन्नई (मध्य) , ३ – चेन्नई (उत्तर), ४ -चेन्न ई (दक्षिण), ५ -चिदंबरम्, ६ -कोईम्बतूर, ७ – कुड्डालोर, ८ – धरमपुरी, ९ – डिंडिगुल, १० – इरोड, ११ – कल्लाकुरीची, १२ – कांचीपुरम्, १३ – कन्याकुमारी, १४ – करूर, १५ – कृष्णगिरी, १६ – मदुराई, १७ – मयिलाडूथुराई, १८ – नागपट्टीणम्, १९ – नमाकल, २० – निलगिरी, २१- पेरंबालूर, २२ – पोलाची, २३ – रामनाथपुरम्, २४ – सालेम, २५ – शिवगंगा, २६ – श्रीपेरुमबुदूर, २७ – टेनकासी, २८ – तंजावर, २९ -थेनी, ३० -थिरुवल्लूर, ३१ -थूथुकुडी, ३२ -तिरुचिरापल्ली, ३३ – तिरुनेलवेली, ३४ – तिरुप्पूर, ३५ -तिरुवन्नमलाई, ३६ -वेल्लोर, ३८ – विल्लूपुरम्, ३९ विरुधुनगर.

तामिळनाडूतील एकूण मतदार
तामिळनाडूत ५.८६ कोटी मतदार आहेत. विशेष म्हणजे २०१७ सालच्या तुलनेत तामिळनाडूतील मतदारांच्या संख्येत ९.०३ लाखांची घट झाली आहे. ५.८६ कोटी मतदारांपैकी २.९६ कोटी मतदार महिला आहेत तर २.९० कोटी मतदार पुरुष आहेत. ५,१९७ मतदार हे किन्नर आहेत.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल
तामिळनाडूत २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक पक्षाने सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी अण्णाद्रमुक पक्षासोबत असलेल्या भाजपने १ जागा जिंकून तामिळनाडूत आपले खाते खोलले होते. तसेच पीएमकेला १ जागा मिळाली होती. या निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही.

First Published on: April 1, 2019 4:17 AM
Exit mobile version