२०२२ पर्यंत गगनयान अंतराळात झेपावणार !

२०२२ पर्यंत गगनयान अंतराळात झेपावणार !

प्रातिनिधिक फोटो

२०२२ पर्यंत भारतीयाला अंतराळात पाठवणार असल्याचा विश्वास इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत गगनयान घेऊन भारतीय पहिल्यांदाच अंतराळात झेपावेल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर लगेचच इस्त्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी आम्ही त्याचीच तयारी करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत भारत देखील अंतराळात मानवाला पाठवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

काय म्हणाले इस्त्रोचे अध्यक्ष?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केल्याप्रमाणे आम्ही गगनयानासाठी तयार आहोत. त्याची तयारी आम्ही यापूर्वीच सुरू केली आहे. केवळ काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर सध्या काम सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे वैज्ञानिक खूप मेहनत घेत आहेत. शिवाय, लक्ष्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकायला सुरूवात देखील केली आहे. अंतराळात मानव पाठवणे ही आव्हानात्मक बाब. त्यासाठी अनेक गोष्टींचा सखोल विचार करावा लागतो.क्रु मॉडेल, वातावरणाशी जुळवून घेणे, लाईफ सपोर्ट सिस्टम यासारख्या गोष्टी अंत्यत बारकाईने पाहाव्या लागतात. यापूर्वी भारताने दोन वेळा मानवरहित यान अंतराळामध्ये पाठवले आहे. अंतराळात मानव पाठवण्यासाठी आम्ही जीएसएलव्ही मार्क – 3 वापरणार आहोत. असे इस्त्रोने स्पष्ट केले.

वाचा – इंटरनेट स्पीड वाढवणारं इस्रोचं नवं यान अंतराळात झेपावणार!

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना भारत २०२२ पर्यंत अंतराळात मानव पाठवेल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर अंतराळात मानव पाठवणाऱ्यांच्या यादीत भारत चौथा असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींच्या या भाषणानंतर इस्त्रोने देखील आम्ही ‘गगनयान’ प्रकल्पासाठी तयार असल्याचे सांगितले.

वाचा – इस्रोचे ‘मानव मिशन’ काय आहे जाणून घ्या

अंतराळ क्षेत्रात भारताची अव्वल कामगिरी

अंतराळ क्षेत्रात भारताने केलेली कामगिरी ही नेहमी उल्लेखनीय आहे. मंगळयान असो किंवा एकाच वेळी १०८ उपग्रह अवकाशात सोडून इस्त्रोने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अंतराळयान मोहिमेसाठी आलेला खर्च पाहून जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. पहिले भारतीय अंतराळवीर राकेश कुमार, भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि कल्पना चावला यांच्या कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

First Published on: August 15, 2018 5:24 PM
Exit mobile version