थप्पडप्रकरणी विल स्मिथने क्रिस रॉकची मागितली माफी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

थप्पडप्रकरणी विल स्मिथने क्रिस रॉकची मागितली माफी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

९४ वा ऑस्कर अॅवॉर्ड सोहळा विविध कारणांनी चर्चेत राहिला. त्यातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे अभिनेता विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या थोबाडीत मारणे. या घटनेला जवळपास तीन महिने झाले. तीन महिने उलटल्यानंतर विल स्मिथने आता क्रिस रॉकची माफी मागितली आहे. त्याच्या युट्यूब आणि इतर सोशल मीडिया अॅपवर एक व्हिडिओ शेअर करत त्याने माफी मागितली.

९४ व्या ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्यात विल स्मिथला किंग रिचर्ड या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कारा मिळाला होता. त्यानंतर, क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे नाराज झालेल्या विल स्मिथने व्यासपीठावरच क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. यावरून जगभरात हलकल्लोळ माजला होता. विल स्मिथला यावरून ट्रोलही करण्यात आलं होतं. तर, काहींनी त्याची बाजूही घेतली होती. यावरून विल स्मिथला शिक्षा म्हणून ऑस्कर सोहळ्यात बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, विल स्मिथला आता त्याच्या कृतीचा पश्चताप झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याला अनेकांनी विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत.

विल स्मिथ व्हिडीओमध्ये म्हणाला की, क्रिस रॉकसोबत मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सध्या माझ्याशी बोलायचं नाहीय. त्याची जेव्हा बोलायची इच्छा होईल, तेव्हा तो बोलेल असा निरोप त्याने पाठवला आहे. त्यामुळे त्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो माझ्याशी बोलेल.

क्रिस मी तुझी माफी मागतो. माझा व्यवहार उचित नव्हता. तुला जेव्हा माझ्याशी बोलायची इच्छा होईल, तेव्हा मी तुझ्याशी बोलायला तयार आहे, असंही विल स्मिथने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

मी क्रिस रॉकच्या आईचीही माफी मागतो. मी त्याच्या आईची एक मुलाखतही पाहिली आहे. त्यावेळी माझ्या डोक्यात असंख्य गोष्टी सुरू होत्या. पण मला त्या जाणवत नव्हत्या. त्यामुळे मी क्रिसच्या आईचीही माफी मागतो. तसेच, त्याच्या संपूर्ण कुटुंबाची माफी मागतो, असं विल स्मिथने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

First Published on: July 30, 2022 4:50 PM
Exit mobile version