जीन्स घातल्यामुळे महिलेला ड्रायव्हिंग चाचणी देण्यापासून नाकारले

जीन्स घातल्यामुळे महिलेला ड्रायव्हिंग चाचणी देण्यापासून नाकारले

ड्रायव्हिंग चाचणीसाठी जाताना काय कपडे घालायचे हा विचार कोणीच करत नसेल, पण चेन्नईमधील महिलांना हा विचार करावा लागणार आहे. कारण नुकतीच एक धक्कादायक घटना तिथे घडलेली आहे. २२ ऑक्टोबरला ड्रायव्हिंग चाचणीसाठी काही महिला जीन्स आणि कॅप्रिस घालून गेल्या असताना चक्क त्यांना चाचणी देण्यापासून रोखण्यात आलं. यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले की, त्यांनी कोणताही ड्रेस कोड लागू केलेला नाही. चेन्नईतील केके नगर आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांनी त्या महिलांना सांगितले की, “तुमचा ड्रेस योग्य नाही, चाचणी घेण्यासाठी सलवार कमीज घाला.”

‘या कारणामुळे कोणत्याही महिलेला परत पाठवण्यात आलं नाही कारण हे कारण बरोबर नाही.’ – आरटीओ अधिकारी 

दुचाकी वाहन चालवत असताना, चालकाला कपडयांमुळे काही अडचण येऊ नये, यासाठी आरटीओचे अधिकारी लोकांना सूचना देत असतात, असं त्यांचं म्हणण आहे. तर ड्रायव्हिंग चाचणी देण्यासाठी आलेल्या पुरुषांनी देखील सभ्य असे कपडे घालावेत. शॉटर्स न घालता फुल पॅन्ट घालाव्यात असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

‘केवळ एक सूचना, नियम नाही’

तेथील अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की, ड्रायव्हिंग चाचणीलादेखील एक “औपचारिक प्रसंग” आहे आणि इच्छुकांनी सभ्यतेचा विचार केला पाहिजे. अजून एका अधिकाऱ्याचं म्हणणं असं होतं की, त्यांनी कधीही कपड्यांवर काहीही नियम बनवलेला नसून फक्त लोकांना त्याबद्दल सूचना दिली. ड्रायव्हिंग स्कूलशी संबंधित काही लोक असंही म्हणतात की अशा सूचना अनेकदा दिल्या गेल्या असून ही गोष्ट त्यांच्यासाठी काही नवीन नाही.

First Published on: October 23, 2019 4:10 PM
Exit mobile version