Video : काय चाललंय काय? महिलेला दिली नवऱ्याला खांद्यावर उचलून चालायची शिक्षा!

Video : काय चाललंय काय? महिलेला दिली नवऱ्याला खांद्यावर उचलून चालायची शिक्षा!

भारतात २१व्या शतकात महिलांच्या सक्षमीकरणाच्या कितीही गप्पा झाल्या, तरी ही जनजागृती शहरी भागापुरतीच मर्यादित असल्याचं पुन्हा एकदा एका भीषण घटनेवरून सिद्ध झालं आहे. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक महिला एका पुरुषाला खांद्यावर उचलून चालत असल्याचं दिसत आहे. त्याशिवाय आसपासची लोकं या महिलेला काठीने आणि हाताने देखील मारत असल्याचं दिसत आहे. खांद्यावरच्या पुरुषाला तिने खाली उतरवताच तिला मारून किंवा रागावून पुन्हा त्याला खांद्यावर उचलायला भाग पाडलं जात आहे. आसपास चालणारी मुलं हा सगळा प्रकार ‘एन्जॉय’ करत असून त्याचं मोबाईलवर हसत हसत रेकॉर्डिंग करत आहेत. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

हा व्हिडिओ मध्यप्रदेशचा आहे…

मध्ये प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातल्या एका गावात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला आणि तिचा पती गुजरातमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वीच ते गावी परतले होते. मात्र, तिथून आल्यानंतर महिलेच्या पतीने तिच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला. या आरोपांनंतर गावकऱ्यांनी महिलेला नवऱ्याला खांद्यावर उचलून गावभर फिरण्याची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या माहितीनुसार महिलेला तीन मुलं असून त्यांच्यासमोर महिलेची अशा प्रकारे धिंड काढली गेली. तर गावातील इतर मुलांनी या प्रकाराचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आपल्याच वडिलधाऱ्या पुरुषांच्या वागणुकीची री ओढली आहे. या प्रकरणी महिलेच्या नवऱ्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.

व्होटबँकेच्या राजकारणापोटी दुर्लक्ष…

दरम्यान, या संदर्भात स्थानिकांच्या सांगण्यानुसार झाबुआ, अलिराजपूर आणि धार या जिल्ह्यांमध्ये आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. या आदिवासी जमातींमध्ये अनेक कुप्रथा आजही अस्तित्वात असून त्या पाळल्या जातात. त्यातलीच ही एक शिक्षा देण्याची प्रथा असून त्यातून महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. मात्र, केवळ निवडणुकीच्या राजकारणाला आणि व्होटबँक गमावण्याच्या भीतीपोटी स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या प्रकरणात लक्ष घालत नाहीत.

First Published on: July 30, 2020 7:45 PM
Exit mobile version