वैद्यकीय चाचणीसाठी ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांना केलं निर्वस्त्र

वैद्यकीय चाचणीसाठी ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांना केलं निर्वस्त्र

काही दिवसांपूर्वी गुजरात भूजमधल्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६८ तरुणींना ‘मासिक पाळी’चा पुरावा देण्यासाठी निर्वस्त्र केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना गुजरातमधील आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये ट्रेनी क्लर्क पदावर काम करणाऱ्या महिलांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या महिलांना निर्वस्त्र करत त्यांची स्त्री रोगसंबंधी वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यासह ‘फिंगर टेस्ट’ देखील घेण्यात आली. या अविवाहीत तरुणींना काही आक्षेपार्ह प्रश्नही विचारण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.

राज्य सरकार संचालित सूरत म्युनिसिपल कॉर्पोरेशन रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. एमएमसी कर्मचारी संघाने पालिका अधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार दाखल केली आहे. सूरत नगर वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये या महिलांना फिटनेस टेस्टसाठी बोलावण्यात आले होते. ट्रेनी महिलांना १०-१० च्या समुहात निर्वस्त्र उभे राहण्याचे आदेश देत जवळपास १०० ट्रेनी कर्मचाऱ्यांची वैद्याकीय तपासणी करण्यात आली.

केवळ पडद्याआड केली चाचणी

चाचणी करताना महिलांच्या सुरक्षेची काळजी देखील घेण्यात आली नव्हती. महिलांना ज्या ठिकाणी निर्वस्त्र उभे करण्यात आले होते ती खोली बंदही करण्यात आली नव्हती. या खोलीमध्ये केवळ एक पडदा लावण्यात आला होता. यादरम्यान, महिलांची वादग्रस्त फिंगर टेस्टही करण्यात आली. यासह त्यांना ‘कधी गर्भ राहिला होता का?’, असे अनेक आक्षेपार्ह प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

 

First Published on: February 21, 2020 1:23 PM
Exit mobile version