धोनीच्या बाद होण्यावर प्रश्नचिन्ह!

धोनीच्या बाद होण्यावर प्रश्नचिन्ह!

क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. या सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीने झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र, भारताला १० चेंडूत २५ धावांची गरज असताना २ धावा काढण्याच्या प्रयत्नात तो धावचीत झाला. तो बाद झाल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशाही मावळल्या आणि अखेर भारत १८ धावांनी पराभूत झाला. परंतु सामना संपल्यानंतर धोनी ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू अधिकृत नव्हता, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

धोनी ४९ व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर धावचीत झाला. लॉकी फर्ग्युसनने तो चेंडू टाकण्याआधी न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षणाची सजावट दाखवण्यात आली. त्यावेळी न्यूझीलंडचे ६ क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर असल्याचे निदर्शनास आले. मात्र, ४० ते ५० या १० षटकांमध्ये केवळ ५ क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची परवानगी असल्याने फर्ग्युसनने टाकलेला तो चेंडू अधिकृतच नव्हता अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. तसेच पंचांनी नो-बॉल दिला असता, तर धोनी २ धावा काढण्यासाठी धावलाच नसता असेही काहींचे म्हणणे होते. मात्र, आयसीसीने याबाबत कोणतेही विधान केले नाही.

भारताला अजूनही तुमची गरज! 
विश्वचषक संपल्यानंतर भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भारताला अजूनही तुमची गरज असल्याने तुम्ही निवृत्तीचा विचारही मनात आणू नका, अशी विनंती करणारे ट्विट जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी केले. नमस्कार धोनी. तुम्ही निवृत्त होणार असल्याचे मी ऐकले आहे. कृपया तुम्ही असा विचार मनात आणू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका, असे लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

First Published on: July 12, 2019 4:45 AM
Exit mobile version