Covid Pandemic: कोरोना दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO चा इशारा!

Covid Pandemic: कोरोना दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO चा इशारा!

जागतिक आरोग्य संघटना

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून सर्वच देश कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी कोरोनावरील औषधं आणि लसीचे संशोधन करत आहेत. अशातच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे. या दरम्यान जीवघेण्या कोरोना विषाणू ‘दीर्घकाळ’ पाठ सोडणार नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. गेल्या सहा महिन्यांतील कोरोना संसर्गाचे मूल्यांकन करणाऱया आपत्कालीन समितीशी चर्चा केल्यानंतर डब्ल्यूएचओने महामारीबाबत ही चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारची महामारी १०० वर्षांतून एकदा येते. मात्र तिचा परिणाम हा पुढील काही दशके कायम राहतो, असे डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसला संपुष्टात आणण्यासाठी अनेक संशोधन तसेच कोरोनावरील औषधं शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा सातत्याने प्रयत्न करत आहे. भारतातसह इतर काही देशांतील कोरोनाच्या रुग्णवाढीच्या वेगावर डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या धोक्याबाबत आपत्कालीन समितीने आतापर्यंत चारवेळा बैठका घेतल्या असून त्यातून महामारीचे मूल्यांकन केले आहे. त्यातूनच महामारीचा धोका दीर्घकाळ साथ सोडणार नसल्याचे भाकित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामारीचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम दीर्घकाळ दिसून येणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. कोरोना विषाणूने जगभरात जवळपास ६ लाख ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १  कोटी ८० लाखांहून अधिक लोकांना विषाणूची लागण झाली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५२ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७७१ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३८ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १८ लाख ३ हजार ६९६ झाली आहे तर सध्या ५ लाख ७९ हजार ३५७ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तसेच ११ लाख ८६ हजार २०३ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केला असून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३८ हजार १३५ जणांचा मृत्यूही झाला असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


GoodNews! भारतामध्ये Covid 19 लसीच्या मानवी चाचणीस DGCI ची मंजुरी!
First Published on: August 3, 2020 1:08 PM
Exit mobile version