साडेचार वर्षात महागाईचा भस्मासूर…

साडेचार वर्षात महागाईचा भस्मासूर…

प्रातिनिधिक फोटो

सरकारच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत महागाईनं उच्चांक गाठला आहे. सरकारकडूनच सांगण्यात आलेल्या महागाईच्या आकड्यानुसार, गेल्या साडेचार वर्षात महागाईचा भस्मासूर झाला आहे. जूनमधील महागाईचा दर ५.७७ टक्के असून मे महिन्यात हा दर ४.४३ टक्के होता. गेल्या चार वर्षातील हा दर सर्वात जास्त असून मागच्या वर्षी जून महिन्यातील महागाईचा दर हा केवळ ०.९० टक्के इतका होता. इंधन, खाद्यपदार्थ, मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांच्या किमती यांनी तर उच्चांकच गाठला आहे.

अंदाजापेक्षा कितीतरी अधिक महागाई

जूनमध्ये साधारण ४.९३ टक्के दर राहण्याचा अंदाज होता. मात्र या अंदाजापेक्षा असणारा दर हा खूपच जास्त आहे. मे महिन्यात दीड वर्षातील सर्वात जास्त अर्थात ४.४३ टक्के इतका दर होता. प्राथमिक वस्तूंच्या किमतीत २ टक्के, इंधन आणि पॉवर बास्केटच्या किमतीमध्ये ३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, खाद्यपदार्थांवरील महागाई दर १.१२ टक्क्यांवरून वाढला असून १.५६ टक्के इतका झाला आहे. त्याशिवाय जूनमध्ये इंधन आणि उर्जाचा दर ११.२२ टक्क्यांवरून वाढून १६.१८ टक्के इतका पोचला आहे. सर्वाधिक महागाई वाढली आहे ती भाज्यांची. दर महिन्याला भाज्यांचा दर वाढत असून २.५१ टक्क्यांवरून ८.१२ टक्क्यांवर आला आहे. तर जूनमध्ये अंड, मांस याचा दर ०.१५ टक्क्यांवरून घसरून – ०.२७ टक्के इतका झाला आहे. सर्वात जास्त महागाई कांदा आणि बटाट्यामागे वाढली असल्याचं समोर आलं आहे. दर महिन्याच्या आधारावर जूनमध्ये बटाटाचा महागाई दर हा ८१.९३ वरून वाढून ९९.०२ टक्के इतका वाढला तर, कांद्याची महागाई १३.२० टक्क्यांवरून १८.२५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं समोर आलं आहे. १२ जुलैला घोषित केलेल्या आकड्यांवरून जूनमधील महागाईचा आकडा हा ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरबीआयनं काढलेल्या अंदाजापेक्षा हा आकडा खूप जास्त आहे.

औद्योगिक उत्पन्न घटलं

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा सर्वात जास्त चिंतेचा विषय बनला आहे. औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. मे मध्ये नोंद करण्यात आलेल्या आकड्यानुसार औद्योगिक उत्पादन ३.२ टक्के इतकं आहे, दरम्यान एप्रिलमध्ये हा आकडा ४.९ टक्के इतका होता.

First Published on: July 16, 2018 3:33 PM
Exit mobile version