कुस्तीपटू विनेश फोगाट कोरोना पॉझिटिव्ह

कुस्तीपटू विनेश फोगाट कोरोना पॉझिटिव्ह

भारताची स्टार कुस्तीपटू आणि भारताला आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगाटला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वत: दिली आहे. तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नाही आहेत. मात्र, तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला आयसोलेट करण्यात आले आहे.

“काल माझी कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाही आहेत. परंतु मी स्वत: ला आयसोलेट केले आहे. माझ्या कुटुंबाला देखील आयसोलेट करण्यात आले आहे. अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने चाचणी करावी, अशी विनंती केली आहे. प्रत्येकजण सुरक्षित रहा!” असे ट्विट तिने केले आहे.

तब्येत बिघडली म्हणून तिने काही दिवसांपूर्वीच सराव शिबिरातून माघार घेतली होती. नुकतेच तिला खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०१६ मध्ये अर्जुन आणि २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गीता आणि बबिता फोगाट यांच्या पावलावर पाऊल टाकत विनेशने कुस्तीची निवड केली. तिने २०१४ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ आणि ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. २०१४ आणि २०१८ च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले.

First Published on: August 28, 2020 9:41 PM
Exit mobile version