दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; ‘सुशांत करू शकतो, तर मी का नाही!

दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; ‘सुशांत करू शकतो, तर मी का नाही!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून या देशाचा निरोप घेतला. त्याच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच जबर धक्का बसला. उत्तर प्रदेशातील एका मुलाने सुशांत याच्या आत्महत्येची बातमी पाहून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हा दहावीत शिकणारा विद्यार्थी उत्तर प्रदेशातील बरेली इथला रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे आणि त्याची आई याआधीच निवर्तली आहे. त्याने सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये सुशांत सिंह राजपूत याचा उल्लेख केला आहे.

या सुसाईड नोटनुसार, त्याचा चेहरा मुलीसारखा आहे, म्हणून लोक त्याची खिल्ली उडवत होते. त्याला तृतीयपंथी म्हणून चिडवत होते. त्याला तो स्वतः तृतीयपंथी असल्याचे वाटू लागले होते. तो चांगला गायक असल्याने मोठे होऊन त्याला कलाशिक्षक व्हायचे होते. पण, तो त्याच्या वडिलांसाठी लाजेचे कारण बनू शकतो, अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याला आत्महत्येखेरीज अन्य कोणताही पर्याय दिसत नव्हता, असे या मुलाने या नोटमध्ये लिहिले आहे.

या दरम्यान सुशांत सिंह याच्या आत्महत्येची बातमी त्याला दिसली होती. त्यामुळे त्याने चिठ्ठीतही सुशांत आत्महत्या करू शकतो, मग मी का नाही, असा प्रश्न देखील लिहिला आहे. आपल्या आत्महत्येसाठी त्याने कुणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. तसेच जे कुणी त्याचा तिरस्कार करत, त्यांनाही आपल्या अंत्यसंस्कारावेळी बोलवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

First Published on: June 16, 2020 4:56 PM
Exit mobile version