कामगार म्हणतात महाराष्ट्राने सेवा केली; योगी म्हणतात ‘ठाकरेंना मानवता माफ नाही करणार’

कामगार म्हणतात महाराष्ट्राने सेवा केली; योगी म्हणतात ‘ठाकरेंना मानवता माफ नाही करणार’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न गंभीर बनला. प्रत्येक राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी आतूर झाले होते. या स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकारण होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस सरकारने लॉकडाऊन दरम्यान मजुरांना दगा दिला आणि त्यांना महाराष्ट्र सोडायला भाग पाडले. या अमानवीय व्यवहारासाठी मानवता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही”, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

कामगार मात्र महाराष्ट्रावर समाधानी

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून जरी नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातून गेलेल्या मजुरांनी मात्र राज्याचे आभार मानले आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटखालीच एका युजरने या व्हिडिओचे ट्विट टाकले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप शासित राज्यांवर टीका करण्यात आली होती. भाजप शासित राज्यांनी स्थलांतरीत मजुरांना राज्यात प्रवेश देण्यापासून वंचित ठेवले होते. त्यामुळे हे सरकार या प्रश्नाची सोडवणूक करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप सामनातून करण्यात आला होता. खासकरुन उत्तर प्रदेश सरकारने मजुरांना राज्यातही घुसू दिले नव्हते, तसेच त्यांच्यासोबत अमानवी व्यवहार केला असल्याचे म्हटले होते. तसेच योगी आदित्यनाथ यांची तुलना हिटलरसोबत करण्यात आली होती.

संजय राऊत यांनी हा अग्रलेख लिहिला होता. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिले आहे की, युपीत पोहोचलेल्या प्रत्येक मजुराचे काळजी वाहण्यात आली आहे. मजुरांना त्यांची कर्मभूमी सोडायला लावल्यानंतर त्यांच्या चिंतेचे नाटक करु नका. सर्व मजुरांना आम्ही आश्वस्त करु इच्छितो की, त्यांची जन्मभूमी आता त्यांची काळजी घेईल.

एका ट्विटमध्ये संजय राऊत यांना देखील टॅग करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, संजय राऊतजी, एक उपाशी लेकरूच आईच्या शोधात येते. जर महाराष्ट्राने सावत्र आई बनून जरी कामगारांना आधार दिला असता तर युतीतल्या लोकांना इथे पुन्हा यावे लागले नसते.

 

First Published on: May 24, 2020 10:34 PM
Exit mobile version