कोरोनाविरोधील लढ्यात कोव्हिड वॉरिअर्स बना, मोदींचे नागरिकांना आवाहन

कोरोनाविरोधील लढ्यात कोव्हिड वॉरिअर्स बना, मोदींचे नागरिकांना आवाहन

जगभरासह देशात कोरोनाचे संकट ओढावले असताना सर्वच स्तरातून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यात सरकारमार्फत covidwarriors.gov.in या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना आपल्या इच्छेनुसार या संकटात सहभागी होऊन कोव्हिड वॉरिअर्स बनून देशसेवा करण्याचे आवाहन केले आहे.

या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कमीत कमी कालावधीत सव्वा कोटी नागरिक जोडले गेले असून असंख्य सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी व स्थानिक प्रशासन हे एकमेकांशी जोडले गेले आहेत. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने डॉक्टर्स परिचारिकांसह आशा स्वयंसेविका, एनसीसी व एनएसएसचे सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मंडळी स्थानिक स्तरावर आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापन करण्याचे नियोजन करत आहेत, या कोरोना परिस्थितीत ते आपला हातभार लावत आहेत, तुम्हीही अशाप्रकारे सहभागी होऊन आपल्या इच्छेने देशाची सेवा करू शकतात.

हिच भारताची संस्कृती आहे…

कोरोना सारख्या कठीण काळात संपुर्ण भारत देश एकवटला असून देशवासियांनी एकजूटीची अनोखी शक्ती दाखवली आहे. त्यामुळे भारतात नव्या बदलांना सुरूवात होताना दिसत आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी सर्वत्र देशात लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या दरम्यान सर्वच यंत्रणा युद्ध पातळीवर कार्य करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय देत असलेल्या लढ्याला पंतप्रधान मोदी यांनी सलाम केला आहे. संपूर्ण जग कोरोनाविरोधात एकवटलं असून जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेने कोरोनाविरोधात दिलेल्या लढ्याची नक्कीच दखल घेतली जाईल, तसेच  “संकटाच्या काळात भारताने जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यामुळे आज मन की बात मधून भारताचे आभार मानले जात आहे” असे देखील मोदी म्हणाले.

First Published on: April 26, 2020 12:23 PM
Exit mobile version