Zomato Order : झोमॅटो ऑर्डरसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे

Zomato Order : झोमॅटो ऑर्डरसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे

मुंबई : दिवस असो वा रात्री कधीही भूक लागल्यास आपण कोणत्याही ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून पार्सल मागवतो. या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधील झोमॅटोवरून पार्सल मागवणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. मात्र, आता झोमॅटोवरून पार्सल मागवण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण जानेवारी ते मार्च या तिमाहीत निकाल जाहीर करण्यापूर्वीच झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी 25 टक्क्यांनी वाढवून 5 रुपये प्रति ऑर्डर केली आहे. तसेच, कंपनीने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही घोषणा केली आहे. यासोबतच झोमॅटोने इंटरसिटी लीजेंड्स फूड डिलिव्हरी सेवा स्थगित केली आहे. झोमॅटो कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. (Zomato Order food orders to now cost more platform hikes fee)

गतवर्षी ऑगस्टमध्ये (2023) झोमॅटोने आपला विस्तार वाढवण्यासाठी आणि कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी 2 रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केली. त्यानंतर दोन वेळा वाढ केली. त्यानुसार, 3 रुपये आणि 1 जानेवारीला 4 रुपये वाढ केली. त्यापूर्वी 31 डिसेंबर रोजी कंपनीने प्लॅटफॉर्म फी तात्पुरती 9 रुपये केली होती.

झोमॅटो दरवर्षी अंदाजे 85 ते 90 कोटी ऑर्डर घेते. केवळ 1 रुपया सुविधा शुल्क आकारल्याने कंपनीच्या उत्पन्नात 85 ते 90 कोटी रुपयांचा फरक पडतो. कंपनीचे हे पाऊल यशस्वी ठरले तर कंपनीला यातून भरपूर नफा मिळण्यास मदत होण्याचे उद्दिष्ट या मागे असल्याचे समजते. झोमॅटो कंपनीच्या माहितीनुसार, जून 2023 पर्यंत कंपनीने 71 टक्के तिमाही नफा कमावला आहे. झोमॅटोने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नफा मिळवल्याची माहिती दिली.

दरम्यान, झोमॅटोने Interity Legends सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. Interity Legends सेवा म्हणजे कंपनी एका शहरातील टॉप रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ दुसऱ्या शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे ऑर्डर स्वीकारायची. मात्र, सध्या ही सेवा नुकतीच थांबवण्यात आली.

याशिवाय, झोमॅटो कंपनीने डिसेंबर तिमाहीत महसुलात 30 टक्के वाढ नोंदवली आहे. सध्या कंपनीचे वार्षिक उत्पादन 2,025 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमतही लक्षणीय वाढते. गेल्या काही महिन्यांत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी सुमारे 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


हेही वाचा – Heatwave : बातम्या वाचताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच बेशुद्ध, उष्माघाताचा फटका

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 11:48 AM
Exit mobile version