मुंबईकर साजरी करत आहेत ग्रीन दिवाळी

मुंबईकर साजरी करत आहेत ग्रीन दिवाळी

मुंबईकर दिवाळी साजरी करताना

दिवाळी आणि फटाके हे समीकरणच. त्याशिवाय दिवाळी साजरी करणे ही कल्पनाच मनाला न पटणारी आहे. पण वाढत्या प्रदूषणाचा विचार केला तर दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याशिवाय आज पर्याय नाही. त्यामुळे दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाके न घेता वृक्षवाटिकेतून झाडाचे रोपटे विकत घेऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरे करणे ही काळाची गरज असल्याची भावना दादरमधल्या ‘फुलराणी’ रोपवाटिकेत येणार्‍या ग्राहकांनी दैनिक आपलं महानगरकडे व्यक्त केल्या.

दिवाळी म्हटलं की रोषणाई आणि आनंद सगळीकडे भरभरून उत्साह. मात्र वर्षानुरूप शहरातील दिवाळीला बदलते स्वरुप आले. दिवाळीच्या निमित्ताने अगदी कपड्यांपासून ते फराळापर्यंत सगळ्याच वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. पण आता काही मुंबईकर दिवाळी उत्सवात फटक्याच्या दुकानात जात नसून ते रोपवाटिकेत जाताना दिसून येत आहेत. वसुबारस ते भाऊबीज हा अतिशय उत्साहाचा दिवाळीचा आठवडा. पण या आठवड्यात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुशिक्षित मुंबईकर झाडाचे रोपटे लावून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करताना दिसून येत आहेत. दादरच्या फुलराणी वृक्षवाटिकेत सोमवारपासून झाडांचे रोपटे विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी झाली आहे. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती विविध झाडाचे एक किंवा दोन असे रोपटे घेऊन जात आहे.

यातील सर्वात जास्त सोनचाफा, हिरवा चाफा, शेवंती, अबोली आणि तुळशीच्या रोपट्याची मागणी जास्त आहेत. या रोपट्याची किंमत १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे. सोबतच हे ग्राहक त्या रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी खते आणि झाड लावण्यासाठी कुंडीसुद्धा घेऊन जात आहेत. पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाकेमुक्त दिवाळीचे महत्त्व पटू लागले आहे. काही सुसंस्कृत पालकही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून सांगत आहेत. सोबतच त्यांच्याकडून दिवाळीत उत्सवात वृक्ष लावून दिवाळी साजरी करत आहेत अशी माहिती फुलराणी वृक्षवाटिकेच्या एका कर्मचार्‍यानी दिली आहे.

रोपट्याचे प्रकार
सोनचाफा, कवठीचाफा, मंदिर चाफा, हिरवा चाफा, पारिजात, अनंत, शेवंती, अबोली, कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, जुई, चमेली, सायली, कोरफड, अडूळसा, मधुनाशनी, वेखंड, कडुलिंब, सोनटक्का, बेल, मंदार, रातराणी, रुद्राक्ष, गोकर्ण, मोगरा, तुळस

फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत नाही, त्यामुळे फटाक्यांची विक्री दिवाळीत मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. किंबहुना फटाक्यांशिवाय दिवाळी हे समीकरण पचवणे समाजाला आज कठीण होऊन बसले आहे. मात्र सर्वांनी यावर विचार करायला हवा. आम्ही पर्यावरण प्रदूषण लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून प्रत्येक दिवाळीला २ झाडाचे रोपटे लावतो.
– निलम मोरे- मुंबई सेंट्रल – ग्राहक

फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणावर याआधीही कित्येक पर्यावरणप्रेमी संस्थांनी टाहो फोडून त्याचे दुष्परिणाम समोर आणले आहेत. पण सर्व प्रयत्न निरर्थक. नागरिकांमध्ये फटाक्यांमुळे होणा-या वाईट परिणामांबाबत जागृती करणे नितांत गरजेचे आहे.आम्ही स्वतः दिवाळीमध्ये झाडाचे रोपटे लावून दिवाळी साजरी करत आहेत. त्यासाठी प्रत्येक वर्षी वृक्षवाटिकेतून जमेल तितके रोपटे घेऊन जातो.
– निर्मला मायकल डिकोस्टा- अंधेरी, ग्राहक

दिवाळी साजरी करतेवेळी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, सोबत पैशाची उधळपट्टीसुद्धा होते. त्यातून आपल्याकडे काही निष्पन्न होत नाही. तुम्ही जेवढं निर्सगावर प्रेम कराल तेवढेच तुम्हाला निसर्ग परत देईल. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाला बाधक असलेल्या प्रदूषणाचा विचार करावा आणि इको फ्रेंडली दिवाळी साजरी करावी.
– श्वेता सुरेश पाटील – ग्राहक – चर्चगेट

First Published on: November 8, 2018 5:56 AM
Exit mobile version