जागावाटपाचा तंटा आणि पहिली घंटा!

जागावाटपाचा तंटा आणि पहिली घंटा!

भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक उत्सवाची शुक्रवारी पहिली घंटा वाजली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले, त्यातल्या काहींनी मागेही घेतले. प्रचारसभांचा धुरळा उडाला आणि सरतेअखेरीस लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी असणार्‍या मतदारांनी शुक्रवारी पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान करत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त केले. ४ जून रोजी जेव्हा मतमोजणी होईल, तेव्हा या उत्सवात कुणाचा झेंडा पुढची ५ वर्षे संसदेवर फडकेल हे समजेल. १८व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास यंदा बराच उशीर झाला.

यावेळी देशभरात तब्बल ७ टप्प्यात मतदान होणार आहे. आता कुठे पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. अजून ६ टप्पे पार पडायचे आहेत. ४ जूनपर्यंतचा हा उत्कंठावर्धक प्रवास असणार आहे. पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी अशा सर्वाधिक १०२ मतदारसंघांसाठी मतदान झाले. महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर मतदारसंघांचा यात समावेश होता.

यानंतर पुढच्या अर्थात दुसर्‍या टप्प्यातील ८८ जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी तिसरी घंटा वाजण्याआधीच महाराष्ट्रातील महायुती आणि महाआघाडीच्या रेंगाळलेल्या काही जागांवरील संभ्रम दूर झाला हे मतदारांच्या दृष्टीने बरे झाले. यामध्ये तिसर्‍या आणि पाचव्या टप्प्यातील जागांचा प्रामुख्याने सामवेश आहेे. यातील सर्वात पहिली जागा आहे ती रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची. या जागेवर गुरुवारी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. तसे पाहायला गेल्यास या जागेवर शिवसेनेचे (ठाकरे गट) विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या सूत्रानुसार ही जागा महायुतीतील शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला जायला हरकत नव्हती.

शिवसेनेचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या जागेवर आपली दावेदारी सांगितली. यानंतर ते थेट नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या भेटीत कुणी, कुणाला काय आश्वासन दिले हे नेमके सांगता येणार नाही, परंतु हे सारे प्रयत्न तोकडे पडले. एकीकडे भाजपच्या यादीत नारायण राणे यांचे नाव झळकले आणि दुसरीकडे किरण सामंत यांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या चर्चा सुरू झाल्या. शिवसेनेच्या हातून ही जागा भाजपने खेचून घेतली हेच खरे.

तिसर्‍या टप्प्यात येणार्‍या सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसचा या जागेवर दावा होता. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील या जागेवरून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, परंतु कोल्हापूरची हक्काची जागा छत्रपती शाहू महाराजांसाठी कुठलीही खळखळ न करता सोडल्याचा दावा करीत ठाकरे गटाने सांगलीसाठी परस्पर उमेदवार घोषित केला. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात बरीच ताणाताणी झाली.

काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांड दरबारी आपली व्यथा मांडूनही उपयोग झाला नाही. अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत येथे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ठाकरे गटाच्या तुलनेत येथे काँग्रेसचे संघटन खूपच मजबूत आहे. त्यामुळे विशाल पाटील काँग्रेसची मते फोडण्यात यशस्वी झाले तर ना मला…ना तुला… अशी अवस्था दोन्ही उमेदवारांची होऊ शकते. या मत विभागणीचा फायदा भाजपचे संजयकाका पाटील यांना होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात एखादी तरी जागा हवी असा हट्ट धरून बसण्यापेक्षा ठाकरे गटाने सांगलीच्या जागेऐवजी उत्तर मुंबईची जागा घ्यावी, असा एक प्रस्ताव काँग्रेसकडून ठाकरे गटाला देण्यात आल्याचे समजते. हा प्रस्ताव किती खरा, किती खोटा हे सांगणे अवघड असले तरी सुज्ञास सांगणे न लगे… एवढे जरी ठाकरे गटाला समजले तरी पुरे.

नाशिकच्या जागेचा तिढाही सुटल्यात जमा आहे. नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याची असूनही या जागेवर कधी भाजप, कधी राष्ट्रवादी, तर कधी मनसेच्या उमेदवाराची चर्चा रंगली होती. त्यामुळे ही जागा शिवसेनेला गमवावी लागतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर माझी उमेदवारी दिल्लीतून पक्की झाल्याचा दावाही केला होता, पण भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाने या दाव्यावर पाणी फेरले.

छगन भुजबळांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा करताच शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या घशात अडकलेला घास खाली उतरला असेल. दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा दिवस उजाडण्याच्या आत महाविकास आघाडी आणि महायुतीतील उरलेल्या जागांचा तिढाही मार्गी लागलेला असेल. त्यामुळे गोंधळात सापडलेल्या मतदारांना निर्णय घेणे तेवढेच सोपे जाईल.

First Published on: April 20, 2024 4:00 AM
Exit mobile version